शहराला लवकरच मिळणार नवीन दोन अग्निशमन बंब
बेंगळूर कार्यालयाकडून मंजुरी : एकूण संख्या होणार चार
बेळगाव : बेळगाव अग्निशमन विभागामध्ये लवकरच आणखी दोन अग्निशमन बंब दाखल होणार आहेत. बेंगळूर येथील कार्यालयाने अग्निशमन बंब देण्यासाठी मंजुरी दिली असून लवकरच हे दोन बंब अग्निशमनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे सध्या दोन वाहनांवर आग विझविण्यासाठीचा असणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. गोवावेस येथील अग्निशमन विभागाकडे सध्या चार अग्निशमन बंब तर रेस्क्यू वाहन आहे. चारपैकी दोन अग्निशमन बंबांचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे हे बंब कार्यालयामध्ये पडून आहेत. केंद्र सरकारच्या नव्या स्क्रॅप पॉलिसीमुळे पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने वापरामध्ये आणता येणार नाहीत. त्यामुळे दोन अग्निशमन बंब सध्या कार्यालयातच उभे करण्यात आले आहेत.
बेळगाव शहराची व्याप्ती पाहता केवळ दोन अग्निशमन बंबांवर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे बेळगाव अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी बेंगळूर येथील मुख्य कार्यालयाला अर्ज पाठवून आणखी दोन नवीन वाहने देण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वीच याला राज्य अग्निशमन विभागाने मंजुरी दिली असून अत्याधुनिक असे दोन अग्निशमन बंब लवकरच बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. अग्निशमन विभागाकडे यापूर्वी 4500 लिटरचे तीन व 9 हजार लिटरचा एक अग्निशमन बंब होता. त्यामुळे एकाचवेळी तीन ते चार ठिकाणी आग लागली तरी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जायचे. परंतु, मागील वर्षभरापासून 4500 लिटरचे केवळ दोनच बंब कार्यरत आहेत. मंजूर करण्यात आलेले अग्निशमन बंब नेमके किती क्षमतेचे आहेत, हे बंब बेळगावमध्ये आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.