अवघे शहर रस्त्यावर..! लाखो गणेशभक्तांनी देखाव्यांचा लुटला आनंद : रात्री उशिरापर्यंत गर्दी
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या नऊ दिवसांपासून शहरात निर्माण झालेल्या गणेशमय वातावरणात सळसळता उत्साह घेऊन तालीम संस्था व मंडळांनी केलेले सजीव व तांत्रिक देखावे पाहण्यासाठी रविवारी रात्री अवघे शहर रस्त्यावर आले होते. रात्री 8 नंतर सुऊ झालेल्या प्रबोधनात्मक देखाव्यांचा सिलसिला मध्यरात्रीपर्यंत सुऊ राहिला. लाखो गणेशभक्तांनीही उशिरापर्यंत देखाव्यांचा आनंद लुटला. सकाळी व दुपारी काहीवेळ पाऊस झाला होता. मात्र रात्री पावसाने उसंत घेतल्याने देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे गर्दीचा महापूर उसळला होता.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांसह खाकी वर्दीतील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांचीही मदत झाली. देवदेवतांची गाणी, मंडळांनी केलेल्या डोळे दीपवणाऱ्या विद्युत रोषणाईमुळे शहर झळाळून निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, राजारामपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ येथील मंडळांचे देखावे आणि गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी उशिरापर्यंत गर्दी केली होती.
राजारामपुरी, शाहूपुरी व जुना बुधवार पेठेतील मंडळांचे प्रबोधनात्मक देखावे पाहून बहुतांश नागरिक मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, सोन्या माऊती चौक मार्गे शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत दाखल होत होते. अनेकांनी रंकाळावेस येथील गोल सर्कल मित्र मंडळाची कोल्हापूरचा राजा नामक लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीत बनवलेल्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे रंकाळावेस परिसर गर्दीने फुलून गेला होता. नाथा गोळे तालमीने साकारलेले अहमदनगरातील हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर गुहा मंदिर पाहण्यासाठी अनेक गणेशभक्तांची रांग लागली होती.
ताराबाई रोड, कपिलतीर्थ मार्केटमधील मित्र मंडळाचा लव्ह जिहाद, खरी कॉर्नर येथील अवचितपीर तालमीचा शूरवीर तानाजी मालुसरे आणि गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशनचा ऐतिहासिक देखाव्यांमधून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. येथील जय शिवराय फुटबॉल प्लेअर्स तऊण मंडळ, दत्ताजीराव काशीद मित्र मंडळ, जासुद गल्ली महादेव मंडळाने सजीव विनोदी देखाव्यांनी गणेशभक्तांना खळखळून हसवले. रात्री उशिरापर्यंत अवघे शहर रस्त्यावर उतरले होते.