For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर काविळीने तर राज्य आतड्याच्या आजाराने त्रस्त

10:21 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर काविळीने तर राज्य आतड्याच्या आजाराने त्रस्त
Advertisement

जनजागृती करणे अत्यावश्यक

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरात काविळीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सखेदाश्चर्याची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा काविळ होण्याचे प्रमाण चार पट्टीने वाढले आहे. शहरात काविळ रुग्ण वाढत असताना राज्यात राज्यातील बहुसंख्य नागरिकांना आतड्याच्या आजाराने त्रस्त केले आहे. अवकाळी पाऊस, कलुषित पाणी, हवामानातील बदल यामुळे गॅस्ट्रो आणि आतड्यांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 29 एप्रिल ते 5 मे या आठ दिवसांतच 4 हजार 375 जणांना ‘अॅक्युट डायेरीया डिसीज’ (एडीडी) ने गाठले आहे. तर गेल्या चार महिन्यात 56 हजार 909 जणांना त्रास झाला आहे. 5 मे पासून पाऊस सुरू झाला असून त्या काळात आतड्याच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्याबरोबरच टायफॉईड, व्हायरल हेपेटायटीस बी. च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया याची लागण झाली आहे. 3 हजार 443 जणांची तपासणी करण्यात आली असून डेंग्यूचे 179 रुग्ण सापडले आहेत. तर 1207 जणांची चिकनगुनिया तपासणी करण्यात आली असून 31 जणांना लागण झाली आहे. या आतड्याच्या आजारांमध्ये जुलाब, उलटी, पोटदुखी, ताप अशी लक्षणे आढळतात. वेळीच उपचार न झाल्यास मूत्रपिंडावर त्याचा परिणाम होतो. यासाठी शक्यतो द्रव सेवन करा, घरासमोर साचलेल्या पाण्यापासून सावध रहा, डासांचा प्रामुर्भाव टाळा अशा सूचना आरोग्य खात्याने केल्या आहेत. या शिवाय बाहेरच्या उघड्यावरील पदार्थ खाऊ नका. ताजे अन्न घ्या, पाणी उकळून प्या, पोटदुखी सुरू झाल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क साधा, अशा सूचना केल्या आहेत.

निवारण न झाल्यास प्रमाण वाढण्याची शक्यता

Advertisement

पाण्यामुळे होणाऱ्या काविळीचे प्रमाण वाढले असल्याने जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. याबाबत शहरातील काही डॉक्टरांनी आरोग्य खात्याने प्रशासनाला व महानगरपालिकेला कल्पना दिली. तसेच दूषित पाण्याची समस्या दूर करण्याची गरज दाखवून दिली. परंतु अद्याप यापैकी कोणत्याच खात्याने ही बाब गंभीरपणे घेतली नाही. येत्या काही दिवसांत या समस्येचे निवारण न झाल्यास काविळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

18 ते 35 वयोगटातील तरुणांचा समावेश अधिक

राज्यात जरी आतड्याचे विकार वाढत असले तरी शहरात मात्र यावर्षी काविळ झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांत ही रुग्ण संख्या वाढत असून काविळीने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरुणांचा समावेश अधिक आहे. पाण्यामुळे होणारी काविळ ही दुर्लक्ष न करण्यासारखी आहे. दुर्दैवाने शहरातील बहुसंख्य विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. अनेक विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले आहे. काविळ होण्याचे मुख्य कारण हे दूषित पाणीच आहे. यावर सर्व प्रथम करण्याजोगी एकच उपाय योजना म्हणजे गरम पाणी पिणे अथवा पाणी उकळून पिणे. जेणेकरून काविळ होण्याची शक्यता 50 टक्क्याने कमी होते.

डॉ. संतोष हजारे-पोट विकारतज्ञ

Advertisement
Tags :

.