For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्योत्सवाच्या नावाखाली शहर वेठीस

07:55 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्योत्सवाच्या नावाखाली शहर वेठीस
Advertisement

विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून अडवणूक : डीजेच्या तालावर धिंगाणा : आवाजाची मर्यादा धाब्यावर

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

राज्योत्सवाच्या नावाखाली कानठळ्या बसणाऱ्या डीजेच्या दणदणाटात शहरात मिरवणूक काढून कन्नडिगांनी बेळगावकरांना अक्षरश: दिवसभर वेठीस धरले. शिवजयंती व गणेशोत्सव काळात डीजेच्या आवाजावर मर्यादा ठेवणाऱ्या प्रशासनाला या मिरवणुकीत मात्र कारवाई करण्याचे धाडस झाले नाही. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीच्या नावाखाली अक्षरश: धांगडधिंगाणा सुरू होता.

Advertisement

बेळगाववर कर्नाटकाचा हक्क सांगण्यासाठी राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. बेळगावसह 865 खेडी महाराष्ट्रात सामील करावीत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात 2004 मध्ये खटला दाखल केला आहे. तेव्हापासून बेळगावात कन्नडसक्ती अधिक तीव्रपणे राबविली जात आहे. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठी भाषिकांच्यावतीने काळादिन गांभीर्याने पाळला जातो. मात्र, अलीकडेच बेळगावात बाहेरून आणलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्योत्सव मिरवणूक काढली जात आहे. दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांना सरकारकडून आर्थिक रसद पुरविली जाते. त्यामुळे कानडी कार्यकर्त्यांचा धिंगाणा वाढत चालला आहे.

दरवर्षी हाणामाऱ्या, चाकू हल्ल्यांचे प्रकार घडत आहेत. यंदा देखील मध्यरात्रीच चन्नम्मा चौकात डीजेच्या आवाजावर हिडीस नृत्य करण्यात आले. हाकेच्या अंतरावर सिव्हिल हॉस्पिटल तसेच न्यायाधीशांची निवासस्थाने आहेत. तरीदेखील शनिवारपासूनच चन्नम्मा चौकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरात ही मिरवणूक सुरूच होती. प्रत्येकवेळी गणेशोत्सव किंवा इतर मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात येऊ नये, आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी, अन्यथा कारवाई करून डीजे जप्त केला जाईल, असा दम प्रशासनाकडून दिला जातो. मात्र, राज्योत्सव मिरवणुकीवेळी प्रशासनाला कायद्याचा विसर पडतो की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कानठळ्या बसणारा व धडकी भरणारा डीजेचा आवाज असह्या बनला होता. त्याचा रुग्ण व वृद्धांना त्रास सहन करावा लागला. घरांचे दरवाजे व तावदाने हादरत होती. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कानात बोळे कोंबून थांबावे लागले. अनेक ठिकाणचे रस्ते बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. प्लास्टीकच्या बाटल्या व इतर केरकचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फेकल्याने शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले. मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून लालपिवळ्या रंगाचा ध्वज घेऊन मिरवण्यात येत होते. गर्दीच्या ठिकाणीही भरधाव वेगाने वाहने हाकण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात होते. दिवाळी तोंडावर असल्याने विविध साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. मात्र, रस्तेच अडविल्याने नागरिक बाजारपेठेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे व्यापारीवर्गाचे प्रचंड नुकसान झाले.

मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण

एरवी महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या काही कन्नड संघटनांनी महाराष्ट्रातील डीजे सिस्टीमला पाचारण केले होते. राज्योत्सव मिरवणुकीत अनेक ठिकाणी मराठी गाण्यांवरही ठेका धरण्यात आला होता. त्याचबरोबर हिंदी गाण्यांचाही वापर केला जात होता. इतर मिरवणुकांवेळी एक बेस, एक टॉपला परवानगी दिली जाते. मात्र, राज्योत्सव मिरवणुकीत डीजेच्या भिंती उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाले.

Advertisement
Tags :

.