शहरात थंडीचा कडाका वाढला
पहाटे-रात्री तीव्रता : ग्रामीण भागात शेकोट्यांचा आधार
प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पहाटे व रात्री हुडहुडी भरू लागली आहे. पारा खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे उबदार कपड्यांनाही मागणी वाढू लागली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
यंदा सातत्याने हवामानात बदल होताना पहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने ऑक्टोबर अखेरपर्यंत हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा ऑक्टोबर हिट म्हणावी तशी जाणवली नाही. मात्र आता वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: पहाटे व रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना थंडीची अधिक तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे कानटोपी, मफलर, स्वेटर, जॅकेटचा वापरही वाढू लागला आहे.
थंडी वाढल्याने सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे किरकोळ रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. विशेषत: दिवसभरच थंडीची तीव्रता जाणवत असल्याने बालक, वयोवृद्ध आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसभरच थंडी
पहाटे व रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे. त्याचबरोबर दिवसभरही थंडी कायम रहात आहे. त्यामुळे बाहेर पडताना थंडीचा सामना करण्यासाठी जॅकेट आणि स्वेटर घालूनच वावरावे लागत आहे. नोव्हेंबर प्रारंभी म्हणावी तशी थंडी जाणवली नव्हती. मात्र आता चार दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.