For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमगावच्या नागरिकांना भोगाव्या लागताहेत नरकयातना

10:08 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमगावच्या नागरिकांना भोगाव्या लागताहेत नरकयातना
Advertisement

परिसरातील बहुतांश गावे अद्याप रस्ता, बस, विजेपासून वंचितच : पावसाळ्यात जीवन जगणे मुश्कील

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली तरी खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अद्यापही मूलभूत सुविधा न मिळाल्याने युवकांना गावं सोडून रोजगारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे. यामुळे आमगाव विकासांपासून लांब जात असल्याने ‘आमगावचे युवक चालले लांब गावी, असे म्हणण्याची वेळ कणकुंबी भागातील आमगाव, माण, हुळंद, सडा आदी गावांच्या बाबतीतही आली आहे. अद्याप या भागातील काही गावांना साधा रस्ता देखील नाही. वाहतुकीची कोणतीही सोय नाही. पावसाळ्यात दोन-तीन महिने विजेचा पत्ता नाही. अशा परिस्थितीत आदिवासीप्रमाणे जीवन जगणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच या भागातील युवक रोजगाराच्या निमित्ताने गावे सोडून मोठमोठ्या शहरांच्या दिशेने चालले आहेत.

Advertisement

विकासापासून अतिशय दुर्लक्षित राहिलेले गाव म्हणजे आमगाव. या गावाला अद्यापही साधा रस्ता नाही. वनखात्याच्या आडमुड्या धोरणामुळे लोकांना अजूनही हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत. ज्या गावाला दळणवळणाची सोय नाही अशा गावचा विकास निश्चितच खुंटलेला दिसतो. कुठलाही अधिकारी तेथे जाऊन पोहचू शकत नाही. सरकारच्या सोयीसुविधा घेण्यासाठीही लोकांची शहराकडे ये-जा होत नाही. त्यामुळे भागातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या तेथील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून, पायी चालत जाणेसुद्धा मुश्कील झाले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मातीचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. बैलहोळ नाल्याजवळील (नदी) रस्त्यावर भल्या मोठ्या चरी पडल्या आहेत.

नऊ ते दहा किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट

पावसाळ्यात आमगावच्या नागरिकांना बेळगाव-खानापूर किंवा गोव्याला जायचे झाले तर नऊ ते दहा किलोमीटर घनदाट जंगलातून पायपीट करून जांबोटी-कणकुंबी या मुख्य रस्त्याला यावे लागते. आजपर्यंत आमगावच्या नागरिकांना लोकप्रतिनिधीकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. नशिबालाच दोष देऊन उपजीविकेसाठी गावे सोडून शहरांकडे स्थलांतर होण्याची वेळ  आली आहे. त्यामुळे गावात फक्त आजी, आजोबा घरं सांभाळताना दिसतात. अशी परिस्थिती फक्त आमगाव या एका गावाची नसून कणकुंबी भागातील प्रत्येक खेड्यात हे चित्र आहे. कणकुंबी भागातील आमगाव व इतर खेड्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार हे येणारा काळच ठरवेल.

Advertisement
Tags :

.