खासगी औषधांचा सुळसुळाट रोखणार
आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : सरकारी रुग्णालय परिसरामध्ये खासगी औषध दुकानांचा (फार्मसी) सुळसुळाट वाढला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्पष्ट केले आहे. सरकारी हॉस्पिटलमधून औषधांचे मोफत वितरण न करता खासगी औषध दुकानांना औषधांचा पुरवठा होत असल्याच्या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हॉस्पिटलमध्ये औषधे असली तरी बाहेरून औषध दुकानातून घेण्यास प्रिस्क्रिप्शन लिहून देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्य केंद्रे, तालुका व जिल्हा रुग्णालयातूनही रुग्णांना मोफत औषधे मिळावीत हाच सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी हॉस्पिटलना औषध पुरवठा करण्यासाठी मागविण्यात येणाऱ्या निविदा वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत सर्व सरकारी रुग्णालयातून 70 ते 80 टक्के औषधे उपलब्ध आहेत. ही टक्केवारी 100 टक्के पोहोचण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. यापूर्वी 257 ते 300 पर्यंतच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये नव्याने एक हजारहून अधिक औषधांची भर पडली आहे. ही सर्व औषधे हॉस्पिटलमधून मोफत मिळणार आहेत. सरकारने गृह आरोग्य ही विशेष योजना सुरू केली असून मधूमेह, उच्च रक्तदाब या आजारांसाठीची औषधे मोफत स्वरुपात घरपोच करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.