ख्रिश्चन समाजाने योजनांचा लाभ घ्यावा
तहसीलदार मंजुळा नायक यांचे आवाहन : मिलाग्रीज चर्चमध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन
खानापूर : ख्रिश्चन समाजाने सरकारने राबवलेल्या योजनेचा फायदा करून घ्यावा,अल्यसंख्याक समुदाय अभिवृद्धी योजनेंतर्गत ख्रिश्चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक ख्रिश्चन समाज विकास महामंडळ स्थापन केले आहे. या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी सरकारने अडीचशे कोटीचा निधीचा राखीव ठेवला आहे. या योजनेतून ख्रिश्चन समाजातील युवक, स्त्रिया तसेच युवतींच्या रोजगार तसेच शैक्षणिक योजना, सामाजिक विकास करून घ्यावा, असे आवाहन खानापूरच्या तहसीलदार मंजुळा नायक यांनी ख्रिश्चन समाजाच्या जनजागृती मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. येथील मिलाग्रीज चर्च हॉलमध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर जो. मंतेरो होते. यावेळी ख्रिश्चन विकास महामंडळाचे जिल्हा संचालक अकबरसाब कुर्तकोटे, अल्पसंख्याक मंडळाचे मंजुनाथ बडसकर यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला जॉर्डन गोन्साल्विस यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी ख्रिश्चन समाज महामंडळाच्या योजनांची माहिती देताना संचालक अकबरसाब कुर्तकोटे म्हणाले, सरकारने प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळे महामंडळे स्थापून समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. महामंडळाच्या माध्यमातून ख्रिश्चन समाजाची शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण, उद्योग व्यवसाय तसेच सामाजिक उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपले उद्योग व्यवसाय सुरू करावेत, आणि आपला विकास करून घ्यावा. तसेच शिक्षणासाठी लागणारी मदतही महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली माहिती आम्ही प्रत्येकापर्यंत पोहचू. यासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात कारुलिमा, रोनाल्ड फर्नांडिस, सायमन डिसोजा, विलास डिसोजा, मायकल नरोना यांनी समाजातील अडीअडचणी मांडल्या. महामंडळाच्या माध्यमातून ख्रिश्चन समाजातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आणि योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ख्रिश्चन समाजातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.