मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही : राजीनाम्यासाठी आंदोलन छेडणार-खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी
खानापूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेले मुख्यमंत्री आहेत. ते स्वत: आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावाने राज्याची लूट केलेली आहे. भ्रष्टाचाऱ्याचे आरोप स्पष्ट होऊनदेखील मुख्यमंत्री राजीनामा देण्यास तयार नाहीत. त्यांना काँग्रेसच्या हायकमांडचा आशीर्वाद आहे. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरण जगजाहीर आहे. सिद्धरामय्याकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी येथील विश्रामधामात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी हे सोमवारी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी नंदगड येथे यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर खानापूर येथील पारायणाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे बोलताना म्हणाले, राज्यात भाजपचे सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या प्रचारात मी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आलो असून तालुक्यात नव्याने 75 हजार भाजपचे सदस्य करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार विठ्ठल हलगेकर आणि खानापूर तालुका भाजपचे पदाधिकारीही सदस्य नोंदणी कार्यक्रमात सक्रीय आहेत. असे त्यांनी सांगितले.
समस्या सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न
तालुक्यातील दुर्गंम भागातील विकास वनखात्याच्या आडमुठे धोरणामुळे अडवला आहे. भीमगड अभयारण्यातील नागरिकांना स्थलांतरासाठी दबाव आणण्यात येत आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, वनाअधिकाऱ्यांनी कायद्यावर बोट ठेवून विकास अडवू नये. तसेच पूर्वांपार असलेल्या गावांना मूलभूत सुविधा देण्यास विरोध करू नये, याबाबत आपण केंदीय वनमंत्र्यांशी व पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करतो. मात्र राज्यात काँग्रेसचे सरकार असल्याने वनमंत्री आडमुठे धोरण घेत आहेत. शेकडो वर्षे अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या नागरिकांना जंगलातून उठवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. बेळगाव-गोवा रस्त्याच्या दिरंगाईबद्दल विचारले असता ते म्हणाले,
आम्ही अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, कंत्राटदाराने पावसाळ्यानंतर कामाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले. रस्ता पूर्ण होण्याअगोदर टोलनाका सुरू केला आहे. याबद्दल ते म्हणाले, याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाशी आपण चर्चा करू, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबद्दल विचारले असता त्यांनी याबाबत आपण माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करू, असे ते म्हणाले. या पुढे आपण किमान तीन महिन्यातून एकदा तरी खानापूरला भेट देऊ, तसेच तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे ते म्हणाले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बसराज सानिकोप, ज्येष्ठ नेते संजय कुबल, सुरेश देसाई, मल्लाप्पा मारिहाळ, पंडित ओगले यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
असोगा भुयारी मार्गाच्या कामाचे ऑक्टोबर 12 तारखेला भूमिपूजन
तालुक्याच्या विकासासंदर्भात चर्चा करताना ते म्हणाले, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. रस्ते, वीज, पाणी या प्रमुख गरजा जरी असल्या तरी भविष्याचा दृष्टिकोन ठेवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी टुरिझम आणि औद्योगिक वसाहत बसवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खानापूर शहर परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची असोगा भुयारी मार्गाची मागणी पूर्ण झाली असून, ऑक्टोबर महिन्याच्या 12 तारखेला या कामाचे भूमिपूजन माझ्याच हस्ते करण्यात येणार आहे.