मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा, डॉक्टरांची भूमिका काय?
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.रुद्रेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक व अपशब्द बोलणारे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. कुट्टीकर यांच्यासह गोमेकॉचे डीन, आरोग्य अधीक्षक आणि ‘गार्ड’चे सदस्य यांच्याबरोबर घेतलेल्या बैठकीत बऱ्यापैकी तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गरज पडल्यास आपण इस्पितळात येतो, असे आश्वासन दिले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना जी अत्यंत अवमानास्पद वागणूक दिली त्याचा काल सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीदेखील समाज माध्यमातून आणि राजकीय क्षेत्रातून जोरदार विरोध झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारवर आलेले संकट दूर करण्यासाठी अत्यंत समजूतदारपणे संबंधित डॉक्टर्सना चर्चेसाठी बोलावणे पाठविले. त्यानुसार गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य अधीक्षक डॉ. राजेश पाटील तसेच आरोग्यमंत्र्यांचे शिकार बनलेले डॉ. रुद्रेश कुट्टीकर हे या शिष्टमंडळात होते. याशिवाय ‘गार्ड’ या डॉक्टरांच्या संघटनेचे प्रतिनिधीदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर दाखल झाले.
यावेळी डॉक्टरांबरोबर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. जो काय प्रकार झाला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तथापि यावर तोडगा काढून डॉक्टरांनी समजुतदारपणे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन आपला संप मागे घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर्सना केली. ‘गार्ड’ या संघटनेने तसेच डॉक्टर्सनी मुख्यमंत्र्यांकडे गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या मांडल्या व त्यावर देखील तोडगा काढा, असे सांगितले.
या बैठकीनंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोमेकॉचे अधिकारी आपल्याकडे आले होते. त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली. एकंदरीत नऊ-दहा विषय चर्चेला आले होते. पैकी आठ -नऊ विषयांवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. आरोग्यमंत्र्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. त्यामुळे आता हा विषय जास्त लावून धरू नका आणि एकंदरीत सर्व प्रकरण संपुष्टात आणा. तसेच पुन्हा संपाचे हत्यार उचलू नका, असे आवाहनही आपण त्यांना केले आहे. यावर डॉक्टर समाधानकारक उत्तर देतील. आपण एवढेही त्यांना सांगितले की गरज पडली तर उद्या म्हणजेच आज 10 जून रोजी सकाळी आपण गोमेकॉत येतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगा. तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. झाला प्रकार विसरून चला. यानंतर परत कधीही असा प्रकार होणार नाही, याची आपण ग्वाही देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
... आणि मुख्यमंत्र्यांनी गड जिंकला
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी चार चौघांमध्ये मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा पाणउतारा केला आणि साऱ्या गोमंतकीय जनतेला धक्काच बसला. गोव्यात असा प्रकार सहसा कधी घडला नव्हता. या प्रकरणामुळे साऱ्या गोव्यात जोरदार चर्चा सुरू झाली. आरोग्यमंत्र्यांच्या या कृत्यामुळे सरकारच्या प्रतिमेला देखील जबरदस्त धक्का बसला. सरकारची प्रतिमा या साऱ्या प्रकरणामुळे मलीन झाली. या प्रकरणामुळे अखेर आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केला आणि सामोपचाराने त्यावर तोडगा काढला आणि नेहमीप्रमाणे शांततेने गड जिंकला. यापूर्वी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे देखील कोणत्याही संकटाच्या वेळी सामोरे जाऊन शांततेने तोडगा काढीत असत. आता डॉ. प्रमोद सावंत हे अशाच पद्धतीने मंत्र्यांच्या वर्तनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर स्वत: तोडगा काढत असतात.