For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्तक्षयाचे सर्वात स्वस्त औषध भारतात !

06:15 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
रक्तक्षयाचे सर्वात स्वस्त औषध भारतात
Advertisement

किंमत केवळ 600 रुपये, इतर देशांमध्ये 77,000 रुपये

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रक्तक्षय या दुर्धर रोगावरील सर्वात प्रभावी आणि सर्वात स्वस्त औषध आता भारतात निर्माण होत आहे. अॅक्युमस ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स या कंपनीने या औषधाची किंमत 99 टक्के कमी केली असून आता ते 77 हजार रुपयांवरुन 600 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगाचे उच्चाटन करण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी हे औषध स्वस्त करण्यात आल्याचे कंपनीचे प्रतिपादन आहे. या औषधाचे नाव हैड्रॉक्सीयुरिया असे असून ते तोंडावाटे घ्यायचे असते.

Advertisement

या रक्तक्षयाचे तांत्रिक नाव सिकल सेल अॅनिमिया असे आहे. या रोगाची लागण प्रामुख्याने वांशिक पद्धतीने होते. या रोगामुळे लाल रक्तपेशींची संरचना परिवर्तीत होते. त्यामुळे त्यांचा आकार कुऱ्हाडीसारखा होतो. त्यांची हालचाल मंदावते आणि त्या शरिराच्या विविध अवयवांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पुरवू शकत नाहीत. शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने शरीर अशक्त होत जाते आणि वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू ओढवतो.

औषधाचा उपयोग

या औषधाचा उपयोग काही प्रकारांचे रक्तक्षय बरे करण्यासाठी केमोथेरपीच्या माध्यमातून केला जातो. हे औषध सिकल सेल अॅनिमियावरही प्रभावी आहे. या औषधामुळे लाल पेशींचा गोल आकार राखला जातो आणि त्यांची रक्तप्रवाहामधून हालचालही वेगाने आणि सुलभरित्या होते. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा सातत्याने होत राहतो. परिणामी प्रकृती ठणठणीत राहते.

सामान्य तापमानातही टिकाव

भारतात निर्माण करण्यात आलेले हे औषध सामान्य तापमानातही टिकते. त्यामुळे इतर देशांप्रमाणे ते 2 डिग्री सेल्शियस ते 8 डिग्री सेल्शियस अशा थंड तापमानात साठवावे लागत नाही. त्यामुळे ज्यांच्या घरी रेफ्रिजरेटर नाही, त्यांनाही या औषधाचा उपयोग करता येतो, अशी माहिती देण्यात आली आहे.

स्वस्त उपलब्धता

इतर देशांमध्ये हे औषध जवळपास 77 हजार रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, भारतात गरीबातल्या गरीबालाही ते विकत घेता यावे, यासाठी त्याची किंमत 600 रुपये करण्यात आली आहे. कंपनी हे औषध स्वत:च्या नावाखाली, तसेच इतर कंपन्यांच्या नावाखालीही उपलब्ध करुन देणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

आदिवासी भागात प्रमाण जास्त

या प्रकारचा रक्तक्षय अपुऱ्या अन्नामुळे तसेच कुपोषणामुळेही होतो. विशेषत: आदिवासी भागांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. पण आता हे औषध किफायतशीर दरात उपलब्ध करुन दिल्याने मर्यादित उत्पन्न असणारे आदिवासी रुग्णही ते विकत घेऊ शकणार आहेत. या औषधाच्या न परवडणाऱ्या किमतीमुळे कित्येकदा सिकल सेल अॅनिमियाच्या रुग्णाचा मृत्यू ओढवितो, कारण तो हे औषध विकत घेऊ शकत नाही. तथापि, आता ही परिस्थिती खूपच सुसह्या झाली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कंपनीचे अभिनंदन केले आहे, अशी माहितीही या औषधाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून देण्यात आली. आपल्या देशात या रोगाचे 50 लाखांहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.

रक्तक्षय औषध गरिबांच्याही आवाक्यात

ड रक्तक्षयावरील भारत निर्मित औषध आता गरिबांनाही परवडण्यासारखे

ड भारतात आदिवासी भागात सिकल सेल अॅनिमियाचे प्रमाण चिंताजनक

ड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी स्वस्तात उपलब्धता

Advertisement
Tags :

.