For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रसन्न चित्तवृत्ती हेच रांगोळीचे वैशिष्ट्या!

06:20 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रसन्न चित्तवृत्ती हेच रांगोळीचे वैशिष्ट्या
Advertisement

रांगोळीला चौसष्ठ कलांमध्ये स्थान : कोणत्याही शुभ कार्याप्रसंगी रांगोळी रेखाटणे महत्त्वाचे

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

माणसाच्या आयुष्यात रंगाला विशेष महत्त्व आहे. रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद भरतात. म्हणून तर रंगपंचमी हा भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत जेथे पाहाल तेथे रांगोळी आणि रांगोळीचे रंग यांनी बाजारपेठेला रंगीबेरंगी केले आहे. रांगोळीला धार्मिक महत्त्व आहेच, परंतु एक कला म्हणूनही ती विकसित झाली आहे.

Advertisement

रांगोळीची नावे तरी किती? रंगवल्ली या संस्कृत शब्दातून रांगोळी हा शब्द पुढे आला. कोणत्याही शुभ कार्याप्रसंगी रांगोळी रेखाटणे महत्त्वाचे मानले जाते. रांगोळीला चौसष्ठ कलांमध्ये स्थान मिळाले आहे. यावरून तिचे महत्त्व लक्षात येते. आपण जी रांगोळी पाहतो ती पूर्वीच्या काळी नव्हती. प्राचीन मराठी वाङ्मयामध्ये पूर्वी धान्य, फुले, विविध प्रकारचे चुर्ण यांचा उपयोग करून रांगोळी काढली जात असे.

रांगोळीमध्ये दोन प्रकार आहेत. बिंदू, रेखा, कोन, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ अशा भूमितीच्या अनुषंगाने काढली जाणारी रांगोळी ही आकृतीप्रधान रांगोळी आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर भारत, दक्षिण भारत येथे या प्रकारची रांगोळी काढली जाते. तर पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार येथे फुले, पाने, झाडे, पशु-पक्षी यांना रांगोळीमध्ये स्थान मिळते. ती वल्लरीप्रधान रांगोळी.

पूर्वीच्या काळी भाताची होलपटे जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून वापरली जात असे. तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते. साळी म्हणजेच भाताच्या लाह्या भिजवून त्या पाट्यावर वाटून त्यापासूनही रांगोळी काढली जात असे. गोपद्म, चंद्र, सूर्य, शंख, स्वस्तिक, श्रृंखला, चक्र, गदा, कासव, कोयरी, आंsकार, श्रीकार, कलश या शुभचिन्हांना रांगोळीमध्ये स्थान मिळत असे.

रांगोळी हे अभिव्यक्तीचेही साधन आहे. महिलांच्या कल्पकतेला रांगोळीमुळे वाव मिळाला आहे. दोन बोटांच्या चिमटीमध्ये रांगोळी घेऊन बारीक रेषेची रांगोळी काढणे हे खरे तर कौशल्याचे काम. मात्र, आज रांगोळीचे स्वरुप बदलले. आता रांगोळ्यांसाठी विविध माध्यमे आपल्यासमोर आहेत. रांगोळीचे स्टीकर्स हा त्यातलाच एक प्रकार. याशिवाय रांगोळीचे छाप, पेन, पाच भोके असलेला रांगोळीचा डबा, ज्यातून रांगोळी पुढे रेखाटत नेता येते. याशिवाय विविध देवदेवतांच्या शुभचिन्हांचे छापसुद्धा बाजारात पाहायला मिळतात.

बिहारमध्ये तांदळाच्या पिठीचा वापर रांगोळीसाठी केला जातो. बंगालमध्येसुद्धा तांदळाच्या पिठीला पाण्यात कालवून कापूस किंवा कापडाचा तुकडा त्यात बुडवून रांगोळी काढली जाते, जिला अल्पना असे नाव आहे. राजस्थानमधील स्त्रिया घराच्या भिंती सारवून त्यावर मोठमोठी चित्रे काढतात, जी मांडना म्हणून पुढे येते. दक्षिण भारतामध्ये गारगोटीच्या दगडाची पुड, विठेची पूड किंवा तांदळाची पिठी यापासून मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटण्याचा प्रकार पाहायला मिळतो. फुलांच्या पाकळ्यांतून रांगोळी वाढवत नेणे त्याचेच गालीचे तयार करणे ही केरळमधील रांगोळी पाकल्लम् या नावाने पुढे येते.

आज फ्लॅट संस्कृती अस्तित्वात आली. पूर्वीसारखे अंगण राहिले नाही. त्यामुळे रांगोळीचा आकारही लहान झाला. परंतु त्यातील वैविध्य टिपण्यामध्ये महिला यशस्वी झाल्या आहेत. विविध संस्था रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून त्यांना वाव देत आहेत. तथापि, आज ही कला केवळ महिलांपुरती मर्यादित राहिली नाही. महिलांनी पुरुषांच्या सर्व क्षेत्रामध्ये आघाडी घेतली तशी पुरुषही आता रांगोळी या प्रांतात निपुण होत आहेत. मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटण्याचे कंत्राट पुरुषवर्गही घेऊ लागला आहे.

रांगोळी रेखाटणे हे शुभचिन्ह आहेच, परंतु आज त्याला व्यवसायाचे स्वरुप आले आहे. कलेला कौशल्याची जोड मिळाल्याने अनेकांना रोजगार मिळाला आहे. माणूस मुळातच रसिक आहे. सुंदर वैविध्यपूर्ण रांगोळ्या व त्यामध्ये भरलेले अनेक रंग पाहून माणसाच्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात, हेच तर रांगोळीचे वैशिष्ट्या आहे.

Advertisement
Tags :

.