गोव्यातील निशा पर्यटनातली अराजकता
रूपेरी वाळू आणि निळ्याशार सागरी पाण्याची भूमी लाभलेला गोवा, मुक्तीनंतर अल्पावधीतच देश-विदेशातल्या पर्यटकांसाठी स्वर्ग म्हणून इथे आलेल्या हिप्पींनी नावारूपास आणला. फेनल लाटांची निरंतर गाज ऐकत, ऊपेरी वाळूत विमुक्तपणे पहुडलेले हिप्पी मन:शांतीसाठी गोव्याकडे वळले परंतु कालांतराने ‘दम मारो दम’ म्हणणाऱ्या अमलीपदार्थ खरेदी-विक्री, सेवन करणाऱ्यांसाठी गोवा आश्रय स्थान ठरले आणि त्यामुळे सागरी पर्यटनाबरोबर गुन्हेगारी जगतातल्या बड्या असामींसाठी गोवा आकर्षण बिंदू ठरला आणि त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय प्रदुषणाने स्थानिक जनतेला शिकार होण्याची वेळ आलेली आहे.
प्रारंभी, पोर्तुगीज सत्तेखाली तीन शतकांहून अधिक काळ असणाऱ्या जुन्या काबिजादीतील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे तालुके सागरी पर्यटनामुळे, इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीखातर हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि कालांतराने पब तसेच नाईट क्लबच्या उभारणीसाठी पोषक ठरले. स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या प्रतिनिधींनी आणि सत्तास्थानी असणाऱ्या राजकारण्यांनी सागर किनाऱ्याशी संलग्न प्रदेशात उपलब्ध जमिनी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानली आणि त्यामुळे पर्यटकांना साधन-सुविधा पुरविण्याच्या नावाखाली अंदाधुंद कारभाराला चालना देण्यातच धन्यता मानली.
त्याचप्रमाणे घरफोडी, खून, बलात्कार त्याचप्रमाणे अन्य प्राणघातक गुन्हे करणारे दिवसाढवळ्या राज्यात निर्धोकपणे उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यामुळेच तिसवाडी, बार्देश, सासष्टी महालांतील बेशिस्त आणि अराजक हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि डान्स क्लब यांचे लोण आज झपाट्याने पेडणे, काणकोणसारख्या तालुक्यांत पसरलेले आहे. जुन्या काबिजादीतल्या बहुतांश युरोपस्थित गोमंतकीयांची जुनी घरे, बंगले भाडेपट्टीवर किंवा विकत घेऊन रेस्टॉरंट, पब आणि डान्स क्लब कार्यान्वित करून, तेथे नशाबाज ध्वनी प्रदुषणाला निमंत्रण देऊन बेधुंद नाचण्यातच धन्यता मानत आहेत. ‘खाओ, पियो, मजा करो’ याच्यासाठी जणू काही माहेरघर ठरलेला गोवा आज कॅसिनो, पब आणि डान्स क्लबांसाठीही विदेशीबरोबर देशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला आहे.
त्यामुळे गोवा म्हणजे नशापुरीच म्हणून प्रकर्षाने समोर येत आहे आणि त्यामुळे नशाबाजीला इथे मुक्तद्वार आहे, अशीच भावना बळावत चालली आहे. सोनाली फोगट या राजकीय क्षेत्रातल्या महिलेचा गोव्यात झालेल्या संशयास्पद मृत्यूची दुर्घटना आणि त्या संदर्भात कर्लीज बीच शॅकचे संबंधित एडविन नुनीस यांना झालेली अटक आणि तत्पूर्वी स्कार्लेट किलिंग या तऊणीच्या झालेल्या हत्येचे प्रकरण असो अथवा रेव्ह पार्ट्या, सनबर्नच्या आकर्षणापायी येणाऱ्या नशाबाजांच्या सराईत टोळ्या यामुळे गोव्याची नशापुरी, भोगभूमी म्हणूनच सर्वत्र चलती आहे. यापूर्वी ‘दी संडे गार्डियन’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात ‘गोल्डन ट्राएंगलच्या ड्रग्स सर्किट’मध्ये गोवा-दिल्ली-इस्त्राइल हा महत्त्वपूर्ण अमलीपदार्थांची ने-आण-विक्रीचा त्रिकोण म्हणून उल्लेख आल्याने, गोव्याची नशापुरी म्हणूनच ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली आहे, ही आजची खरी शोकांतिका आहे.
डिसेंबर आणि जानेवारी या कालखंडात नाताळ, इंग्रजी नववर्ष त्याचप्रमाणे सनबर्न आणि तत्सम पार्ट्यांमध्ये खास सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विदेशींबरोबर देशी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांपासून गोव्यात सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातल्या बार्देश तालुक्यातल्या हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबमध्ये रविवारी 7 डिसेंबरच्या रात्री पायरो गनच्या माध्यमातून केलेल्या आतषबाजीमुळे लागलेल्या भीषण अग्नी प्रलयात 25 जणांचा बळी गेल्याने आणि क्लबचे मुख्य सूत्रधार लुथरा बंधू निर्धोकपणे थायलंडच्या फुकेटमध्ये पसार होण्यात यशस्वी झाल्याने, या प्रकरणाची काळी बाजू अधोरेखित झालेली आहे.
एकेकाळी बार्देशातील हडफडे कृषीप्रधान आणि पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या गोमंतकीयांचा गाव होता परंतु कळंगुट पाठोपाठ हणजुण, वागातोरप्रमाणे सागरी पर्यटनांचे प्रस्थ हडफडेतल्या किनारपट्टी नियमन क्षेत्रात बेकायदेशीरपणे विस्तारात गेले. एकेकाळी जेथे शेती, मिठागरे, दलदलीच्या आणि पाणथळीच्या जागा अस्तित्वात होत्या, तेथेच पर्यटकांच्या विशेषत: नशाबाजांच्या सोयीखातर नाईट, पब क्लब उभे राहात गेले. त्यामुळे अग्नी आणि विद्युत सुरक्षितता याबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या कायदे-कानून यांनाच चक्क सुऊंग लावून, निशा पर्यटनात हडफडेप्रमाणे अन्य किनारपट्टी परिसरात अभिवृद्धी झालेली पाहायला मिळते.
यापूर्वी लुथरा बंधुंचा वागातोर येथील ‘रोमियो लेन शॅक’ जमिनदोस्त करण्याचा आदेश डिसेंबर 2023 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेला होता परंतु अशा धनिकांच्या बेकायदेशीर कृत्यांकडे सरकारी यंत्रणेला कानाडोळा करण्यास कोणी भाग पाडले आहे? पर्यावरणीय नियमावलीबरोबर सागरी नियमन क्षेत्राच्या अस्तित्वाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याकारणाने आज सागरी पर्यटन जेथे जेथे चालू आहे, तेथे तेथे अमलीपदार्थांची खरेदी, विक्री, सेवन यांच्याबरोबर मद्यपानाचा आस्वाद घेत धांगडधिंगाणा घालणाऱ्या नृत्य रजनीच्या जल्लोषावेळी गैरकृत्येही सुरू आहेत.
हडफडे येथील अग्नी प्रलयाच्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकर्षाने गोव्यातील सागरी पर्यटन क्षेत्राची सुरक्षा विरहित, बेकायदेशीर, अराजक आणि भेसूर बाजू समोर आलेली आहे. सामाजिक, सांस्कृतिक प्रदुषणाबरोबर गोव्यातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाला कवडीमोल ठरवून, सागरी पर्यटनाच्या गोंडस नावाखाली, जो धांगणधिंगाणा बेशिस्तीने चालू आहे, ती या सागर आणि सह्याद्री यांच्या कुशीत वसलेल्या गोव्याच्या सुंदर भूमीच्या वर्तमान आणि भविष्यासाठी धोकादायक आहे.
- राजेंद्र पां. केरकर