For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैती देशात गुन्हेगारी टोळ्यांचा हैदोस आणि अराजक

06:01 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हैती देशात गुन्हेगारी टोळ्यांचा हैदोस आणि अराजक
Advertisement

हैत्ती हा लॅटिन अमेरिकेतील वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश मानला जातो. 1804 साली या देशास फ्रेंचांच्या वसाहतीपासून स्वातंत्र्य मिळाले. या देशाची लोकसंख्या 85 लाखाहून अधिक आहे. लोकसंख्येपैकी बहुतांश लोक कृष्णवर्णीय आहेत. हैतीचे मुख्य उत्पादन कॉफी, कापूस, कोको, तंबाखू असून बॉक्साईट हे खनिज देशात मुबलक प्रमाणात आहे. पोर्ट-औ-प्रिन्स हे हैतीचे राजधानी शहर आहे. देशाचा मुख्य धर्म ख्रिस्ती असून देशात केवळ 45 टक्के लोक साक्षर आहेत. कॅरेबियन देशातील एक महत्त्वाचा देश म्हणून हैतीची गणना होते. अशा या देशात सुरु असलेला प्रचंड हिंसाचार व अराजक आणि या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान एरियल हैन्री यांनी दिलेला राजीनामा या घटनांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisement

गेल्या आठवड्याच्या आधीपासून हैतीमधील राजकीय हितसंबंध असलेल्या शक्तीशाली टोळ्यांनी पोर्ट-औ-प्रिन्स या राजधानी शहरातील जनजीवन वेठीस धरले आहे. तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त करणे, बंदर ताब्यात घेणे, दुकानांची लुटालूट, पोलीस यंत्रणेवर हल्ले आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेणे अशी अभूतपूर्व कृत्ये टोळ्यांनी केली आहेत. यापूर्वी विशेष पोलीस दलात असलेल्या आणि सध्या टोळी सम्राट बनलेल्या जमी बारबेक चेझियर याने गुन्हेगारी टोळ्यांचे ध्येय हे एरियल हेन्री यांची सत्ता उलथवून नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे व लोकशाही पु:र्नस्थापित करण्याचे आहे.’ असे विधान टोळ्यांच्या समर्थनार्थ केले आहे.

गुन्हेगारी टोळ्यांनी जेव्हा राजधानी व इतरत्र हैदोस घालण्यास सुरुवात केली तेव्हा पंतप्रधान हेन्री यांनी केनियाचा आश्रय घेतला होता. अमेरिकेतील त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांना टोळी हिंसाचारापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान सध्या सुरू असलेल्या हिंसाचारात अनेकजण ठार वा जखमी झाले आहेत तर 15,000 नागरिक घरेदारे सोडून विस्थापित झाले आहेत. नागरिकांना अन्न व पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अमेरिका आणि इतर काही देशांनी आपले दूतावास संभाव्य हल्ल्यापासून वाचविण्यासाठी अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केनियात आश्रय घेतलेल्या हेन्री यांनी युनोपुढे हैतीमध्ये कायदा व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी 1000 केनियन पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

Advertisement

पंतप्रधान हेन्री यांनी यापूर्वी दोनदा देशात निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी ते पाळले नाही. टोळी हिंसाचाराची चिन्हे दिसताच त्यांनी 15 कॅरेबियन देशाच्या एका व्यापारी समुहाच्यावतीने 2025 च्या मध्यकाळात निवडणुका घेण्याचे आश्वासन देत टोळ्यांना शांतवण्याचा प्रयत्न केला परंतु तो देखील यशस्वी झाला नाही.

सुरुवातीस युनोने केनयाच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय दल पाठविण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे हैतीतील नागरिकांत थोडी आशाही निर्माण झाली. बेलगाम टोळ्यांना यामुळे लगाम बसेल असे वाटले होते. परंतु सदर योजनेत पूर्णपणे युनोच्या शांतीदलाचा अंतर्भाव नसल्याने केनियन दलास युनोचा पाठिंबा असलेले हे दल कितपत यशस्वी होईल यावरच प्रश्नचिन्ह आहे. कारण 2004-2017 सालची युनोची अशाच तऱ्हेची मोहिम लैंगिक अत्याचार, गैरवर्तणूक याने बाधीत झाली होती. युनोच्या तळांमधून जे सांडपाणी विसर्जित झाले त्यातून कॉलऱ्याची साथ निर्माण होऊन 10,000 हैती नागरिक प्राणास मुकले होते व रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती निर्माण झाली होती. हैतीमधील टोळ्यांना आवर घालण्यास हैती देशाचे स्वत:चे सुरक्षा दल असमर्थ आहे. शिवाय युनोच्या पुढाकाराने जरी शांतता दल तैनात केले गेले तर त्याचे कार्य टोळ्यांना संपविण्याचे नसून राजधानीस जाणाऱ्या रस्त्यांची सुरक्षितता राखणे, देशांची संसाधने वाचवून नागरी सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी प्रयत्न करणे या पुरतेच मर्यादित राहणार आहे. यासाठीही  दलातील सदस्यांना परिपूर्ण प्रशिक्षण असण्याची गरज आहे. कारण हैतीमधील टोळ्यांतील गुंड व गुन्हेगार हे नागरिकांप्रमाणे वेश परिधान करीत असल्याने दोहोतील फरक ओळखणे कठीण बनले आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी बेनिन, छाड, बांगला देश, बार्बाडोस, बहामा या देशांनी अधिकारी पाठवण्याचे कबूल केले आहे. परंतु हेन्री यांचा राजीनामा व राजकीय अराजकामुळे यासाठी नागरिकांना आता अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे.हैतीमधील गरिबी आणि राजकीय अस्थिरतेचा इतिहास खूप मोठा व दीर्घकालीन आहे. कृष्णवर्णीय क्रांतीकारकांनी 1804 साली गुलामीच्या बेड्या तोडल्या, परंतु या गुलामीतून मुक्त होण्यासाठी फ्रेंचांना त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भरपाई द्यावी लागली होती. त्यातून देशावर इतके कर्ज झाले की काही शतके या देशाचा विकास खुंटला. 1959 पासून हैतीमधील राजकीय पक्षांनी राज्य करण्यासाठी सातत्याने बेरोजगारांच्या टोळ्यांचा आधार घेतला. त्यातच दुर्दैवाची बाब म्हणजे प्रॅन्कोईस ‘पापा डॉक’ डुवालियर हे कुप्रसिद्ध हुकूमशहा तेथे सत्तेवर आले. 1957 ते 1971 या आपल्या सत्ताकाळात त्यांनी माजी सैनिक व गुन्हेगार यांना जमवून टोन्टस मॅकाउट्स नावाचे एक नीमलष्करी दल स्थापन केले. राजकीय शत्रूंना तुरुंगात टाकीत, ठार मारीत आणि सामूहिक बलात्काराचे साधन वापरीत त्यांनी दहशतवादी पद्धतीने देशावर राज्य केले. 1986 साली डुवालियर कुटुंबास सत्तेवरून हटवण्यात आले. तरीही पुढे बराच काळ हैती हा देश लष्करी कट आणि विदेशी हस्तक्षेपांच्या मालिकांत अडकत राहिला. 1995 साली हैतीयन लष्कराचे विघटन झाले. यामुळे हजारो सशस्त्र सैनिकांना कामच राहिले नाही. नेतृत्वाची पोकळीदेखील निर्माण झाली. अशा काळात 2001 साली पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे सत्ता स्थापन करण्यासाठी कट केला. पण तो सशस्त्र निवृत्ती सैनिकांनी व गुंड टोळ्यांनी हाणून पाडला.

दरम्यान लॅटीन अमेरिका व अमेरिका देश यामधील हैतीच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे हा देश अंमली पदार्थांच्या व्यापाराचे नंदनवन बनला. यामुळे तेथील गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक आधार लाभला. अशावेळी रेने प्रेव्हल या नेत्याने लोकशाही पद्धतीने निवडून येत देशाची सूत्रे हाती घेतली. आपल्या सत्ताकाळात त्यानी देशातील गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली आणि त्यांना बराच आळा घातला. देशाची स्थिती थोडी स्थिरस्थावर होते न होते तोच 2010 साली मोठ्या भूकंपाने प्रचंड मनुष्य व वित्तहानी होऊन देशाची अर्थव्यवस्था रसातळास गेली. या परिस्थितीचा फायदा घेत हजारो टोळी सदस्य जे तुरुंगात होते ते पुन्हा बाहेर येऊन मोकाट सुटले. तेव्हापासून देश पूर्णत: टोळ्यांच्या विळख्यात सापडला आहे.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.