For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटनाची बदलती दिशा...

06:16 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्यटनाची बदलती दिशा
Advertisement

पर्यटन...अलीकडच्या काळात झपाट्यानं वाढलेलं क्षेत्र... भारताची वैशिष्ट्यां, लपलेली क्षमता नि एकंदर जागतिक बाजारपेठ यांचा विचार केल्यास आपल्याला त्यात झेप घेण्यास प्रचंड वाव...या क्षेत्राला मोठी चालना मिळालीय ती देशी पर्यटकांचा आकडा वेगानं फुगत चाललेला असल्यानं. सध्या चालू असलेल्या युद्धानं वैद्यकीय पर्यटनाला फटका दिलेला असून आपल्या नागरिकांच्या परदेशवारीलाही मुरड घातलीय...देशी पर्यटकांना चालना देतानाच आपण भर द्यायला हवा तो विदेशी पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात खेचण्यावर...

Advertisement

पर्यटन...साऱ्या जगभरातील लोकांना आपल्या दिशेनं खेचणारा शब्द...त्यानं सविश्वाला वेड लावलंय असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये...पर्यटन आता पूर्वीप्रमाणं केवळ एका हगामापुरतं मर्यादित राहिलेलं नाही...ती बनलीय साऱ्यांचीच वर्षभर चालणारी हौस...विशेष म्हणजे सध्याच्या जमान्याचा विचार केल्यास त्यात लपलीय आर्थिक वृद्धी देखील. उदाहरणार्थ स्पेनसारखा देश फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो तो जगभरातून येणाऱ्या लोकांच्या डॉलर्सवर. ‘दि वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल’च्या अंदाजानुसार, 2024 मध्ये पर्यटनानं नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत त्या विश्वातील सुमारे 36 कोटी लोकांना. त्याचं जागतिक प्रमाण 10 लोकांमध्ये एक असं...खेरीज पर्यटनाचा जागतिक ‘जीडीपी’तील वाटा सुमारे 10 टक्के. आता वेळ आलीय ती भारतानं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पर्यंटन क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्याची...

भारताची नैसर्गिक संपत्ती नि येथील सांस्कृतिक समृद्धी यांच्यात क्षमता आहे ती साऱ्या विश्वावर मोहिनी घालण्याची...हिमालयापासून गोव्यातील लुभावणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, सुंदरबनपासून राजस्थानातील उष्ण व लडाखमधील थंड प्रदेशांपर्यंत आपला देश विविधतेचं विलक्षण दर्शन घडवितो...समृद्ध भारताची अन्य दोन जबरदस्त वैशिष्ट्यां म्हणजे येथील खाद्यसंस्कृती अन् इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व...परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे विदेशी पर्यटकांचा विचार केल्यास भारताचा वैश्विक बाजारपेठेतील हिस्सा फक्त 1.4 टक्के...जगभरातल्या पर्यटकांनी 2024 मध्ये खर्च केलेत ते तब्बल 1.6 ट्रिलियन डॉलर्स आणि हा आकडा येऊ घातलेल्या पाच वर्षांत बहुतेक पोहोचणार तो 2 ट्रिलियन डॉलर्सवर...

Advertisement

नवी दिल्लीला आपल्या वैशिष्ट्यांच्या जोरावर शक्य आहे ते किमान पाच टक्के वैश्विक पर्यटकांना खेचणं नि येऊ घातलेल्या दशकात एक प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्र बनणं. सध्या भारताच्या खिशात पर्यटनापासून पडतात सुमारे 28 अब्ज डॉलर्स. हा आकडा 100 डॉलर्सवर नेणं पद्धतशीररीत्या प्रयत्न केल्यास फारसं कठीण नाहीये. खेरीज थेट नोकरी मिळेल ती सुमारे 25 लाख नागरिकांना...भारताला विदेशी नागरिकांचा उत्साह वाढावा, त्यांना चांगला अनुभव मिळावा यासाठी सर्वप्रथम भर द्यावा लागेल तो कनेक्टिव्हिटी, सुरक्षा, सुलभता, नि स्वच्छता यावर. शिवाय जगभरात राष्ट्राच्या पर्यटनाचं मार्केटिंग करणं फार फार महत्त्वाचं...

आपल्या देशातल्या कुठल्याही पर्यटनस्थळाचा विचार केल्यास तिथं वर्चस्व असतं ते पर्यटन, वाहतूक, वन, नगरविकास आदी 15-20 खात्यांचं आणि त्यांच्यात समन्वयाचं दर्शन अजिबात घडत नाही. याचा फटका बसतोय तो उच्च दर्जाच्या विदेशी पर्यटकांना...यावर तोडगा म्हणजे ‘डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन्स’ वा ‘डीएमओ’वर भर देणं. सुरुवात करावी लागेल ती सुमारे 20 जागतिक दर्जाच्या स्थळांपासून. त्यात समावेश असायला हवा तो हंपी, खजुराहो, पुरी, कोची, कोणार्क, जैसलमेर, काझीरंगा, महाबलिपूरम, उदयपूर, अजंठा, एलोरा, आग्रासारख्या विख्यात नावांचा...

या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, गरज आहे ती सरकारनं प्रत्येक स्थळाच्या ठिकाणी साधनसुविधांच्या उभारणीसाठी सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची. ‘डीएमओ’चं व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी ती गुणवत्ता असलेल्या व्यक्तीकडे. खेरीज हॉटेल्स, दळणवळणसारख्या उद्योगांत प्रवेश करायला हवा तो ‘पीपीपी’ मॉडेलनं...त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातच्या केवडियामधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’. फक्त पाच वर्षांत तिथं भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या केवळ 15 हजारांवरून पोहोचलीय ती वर्षाकाठी 4 लाख 40 हजारांवर...

अनेकांची ओरड असते ती महागाईच्या बाबतीत. त्यांना गोवा वा केरळ यांच्यापेक्षा थायलंड, दुबई वा व्हिएतनाम अधिक स्वस्त वाटतात. ते खोटं देखील नाहीये...कारण सिंगापूर, बँकॉक, हाँगकाँग, क्वालालंपूर, कोलंबोसारख्यांशी तुलना केल्यास भारतात साधं हॉटेल वा रिसॉर्ट उभारताना घाम फुटण्याची पाळी येते...अन्य एक बाब म्हणजे तेथील ‘फ्लोअर एरिया रेशो’ 5-12 इतका असून भारतातलं प्रमाण 1 ते 3 टक्के. भारतात एखाद्या हॉटेलच्या निर्मितीसाठी गरज पडते ती 98 मंजुरींची, तर श्रीलंकेतलं प्रमाण 14 व सिंगापुरातलं अवघं 7. ही परिस्थिती मोडीत काढण्यासाठी तेलंगण, उत्तर प्रदेश, ओडिशासारख्या राज्यांनी जोरदार प्रयत्न केलेत...त्यात भर पडलीय ती ‘इनक्रेडिबल इंडिया’सारख्या यशस्वी मोहिमेचे तीन तेरा वाजल्यानं !

भारतातील अभयारण्यं : 573 (विश्वात सर्वांत जास्त)...

राष्ट्रीय उद्यानं : 116 (जगात तिसरा क्रमांक)...

‘युनेस्को’ची जागतिक वारसास्थळं : 43...

युद्धामुळं झालेला बदल...

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळं केवळ तेलाच्या बाजारपेठाच नव्हे, तर मध्यपूर्वेतील जागतिक प्रवास व्यवस्थाही विस्कळीत झालीय...याचा जोरदार फटका बसलाय तो पर्यटनाला...‘जागतिक प्रवास व पर्यटन परिषदे’च्या मते, मागणी घटल्यामुळं या प्रदेशाला पर्यटकांच्या खर्चापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात नुकसान सोसावं लागतंय ते दररोज किमान 60 कोटी डॉलर्सचं (5 हजार कोटी रुपये)...मध्यपूर्व हा प्रदेश सुमारे 5 टक्के आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आणि 14 टक्के जागतिक ‘ट्रॅन्झिट ट्रॅफिक’ला (प्रवासादरम्यान थांबणाऱ्या प्रवाशांना) खेचतो...युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी दुबई, दोहा नि अबुधाबी यांसारखी प्रमुख केंद्रं दररोज पाच लाखांहून अधिक प्रवाशांना हाताळायची. आता तेथील व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झालेत...

हा संघर्ष सुरू होण्यापूर्वी यंदा मध्यपूर्वेत आंतरराष्ट्रीय पर्यटक सुमारे 207 अब्ज डॉलर्स खर्च करतील अन् आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत जवळपास 13 टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता हे चित्र पूर्णपणे पालटलंय...यावर्षी या भागातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 2.3 ते 3.8 कोटींनी कमी होण्याची शक्यता असून त्यामुळं पर्यटन महसुलात तोटा नोंदविला जाऊ शकतो तो 34 ते 56 अब्ज डॉलर्स इतका...

या पार्श्वभूमीवर यातून एक अनपेक्षित लाभार्थी समोर येऊ लागलाय आणि तो म्हणजे भारताचा पर्यटन उद्योग...या युद्धामुळं जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास रद्द होणं, हवाई क्षेत्रं बंद होणं आणि सुरक्षेबाबतच्या चिंता निर्माण झाल्या असल्या, तरी दुसऱ्या बाजूनं प्रवासाच्या पद्धतींमध्येही बदल घडताहेत. अधिकाधिक भारतीय आता पश्चिम आशियातील पारंपरिक केंद्रांऐवजी देशांतर्गत पर्यटनस्थळांना पसंती देऊ लागलेत...या उद्योगनुसार, परदेशवारीबाबतचा उत्साह बराच कमी झाला असून काही विशिष्ट विभागांतील प्रवासाच्या आरक्षणात 30 ते 60 टक्क्यांची घट दिसून आलीय. याचे पडसाद विदेश प्रवासाशी संबंधित असलेल्या परकीय चलन बाजारपेठेतही उमटू लागलेत अन् व्यवहारांचं प्रमाण घसरलंय ते तब्बल 80 ते 90 टक्क्यांनी...

अधिकाधिक भारतीय नागरिकांना आता परदेशाऐवजी देशांतर्गत प्रवास करणं सुखकर नि सुरक्षित वाटायला लागल्यानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर, लडाख यासारखी थंड हवेची ठिकाणं आणि राजस्थान, ईशान्य भारत (त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय) तसंच गोवा व अंदमानसारख्या समुद्रकिनाऱ्यांसाठी विख्यात पर्यटनस्थळांकडील पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय...भारतातील पर्यटनाच्या प्रमुख केंद्रांच्या हवाई प्रवासाच्या बूकिंगमध्ये झालेल्या वृद्धीचा विचार केल्यास 69 टक्क्यांच्या (मागील वर्षाच्या तुलनेत) वाढीसह आघाडीवर आहे तो उदयपूर व त्यानंतर जोधपूर (47 टक्के)...त्यांच्यामागं बागडोगरा (44 टक्के), श्रीनगर (41 टक्के) अन् अगरताळा (38 टक्के) यांचा क्रमांक लागतो...गोवा, जम्मू नि डेहराडून यांच्या बाबतीतही दोन अंकी उसळी पाहायला मिळालीय...

वैद्यकीय पर्यटनाला तडाखा...

? पश्चिम आशियातील युद्धामुळं मोठा फटका बसलाय तो भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्राला...राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर), महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण यासारख्या प्रमुख वैद्यकीय केंद्रांमध्ये आंतरराष्ट्रीय ऊग्णांच्या भेटींत 30 ते 40 टक्क्यांची घट झालीय. तसंच वैद्यकीय पर्यटनाशी संबंधित महसुलातही तितकीच घसरण दिसून आलीय...

? या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गेल्या काही दिवसांत ही घसरण वेगानं वाढली असून काही आरोग्य सेवा समूहांनी पश्चिम आशियातून येणाऱ्या ऊग्णांच्या संख्येत 75 टक्क्यांची घट नोंदवलीय...

? याचा अर्थ संपूर्ण क्षेत्राच्या मासिक महसुलात 15 ते 20 टक्क्यांची घट झालीय, तर काही वैद्यकीय संस्थांनी सुमारे 35 टक्क्यांची घसरण नोंदवलीय...दिल्लीतील काही ऊग्णालयांमध्ये वैद्यकीय पर्यटनाशी संबंधित महसूल 30 ते 40 टक्क्यांनी कमी झालाय...

? सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंतित असलेल्या अनेक आरोग्य सेवा समूहांनी आता शोध घेण्यास सुऊवात केलीय ती नवीन बाजारपेठांचा....जाणकारांनी सांगितलंय की, इस्पितळं आता आपलं लक्ष पश्चिम आशियाकडून (आंतरराष्ट्रीय ऊग्णांच्या बाजारपेठेत 18 ते 30 टक्के वाटा) दक्षिण नि आग्नेय आशिया (इंडोनेशिया, श्रीलंका), आफ्रिका (नायजेरिया, केनया व मॉरिशस) आणि मध्य आशिया यांसारख्या प्रदेशांकडे वळवू लागलीत...

? तज्ञांच्या मते, विमानसेवा रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका पश्चिम आशियातील ऊग्णांना बसलाय. जरी काही मार्गांवर विमानसेवा पुन्हा सुरू झाली असली, तरी विमानांच्या भाड्यांमध्ये 15 ते 25 टक्क्यांची वाढ झालीय...परिणामांची झळ तीव्रपणे जाणवायला लागलीय ती प्लास्टिक सर्जरी, वृद्धापकाळविषयक उपचार, अस्थिरोग आणि वंध्यत्व निवारण यासारख्या विभागांमध्ये...

उत्तर प्रदेश आघाडीवर...

? धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचं व्यापक नूतनीकरण तसंच आधुनिक पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास यामुळं उत्तर प्रदेश हे देशांतर्गत पर्यटनासाठी सर्वांत लोकप्रिय ठिकाण म्हणून पुढं आलेलं असून परदेशी पर्यटकांच्या आगमनाच्या बाबतीत ते चौथ्या क्रमांकावर पोहोचलंय...

? भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये 137 कोटींहून अधिक देशी अन् 3.66 लाख परदेशी पर्यटकांनी ‘यूपी’ला भेट दिली...

? यात सर्वांत महत्त्वपूर्ण योगदान राहिलं ते प्रयागराज येथील भव्य ‘महाकुंभा’चं. त्याला 66 कोटींहून अधिक भाविकांनी ऐतिहासिक उपस्थिती लावली...जोडीला अयोध्या, वाराणसी, मथुरा-वृंदावन ही ठिकाणं पर्यटनाची प्रमुख केंद्रं म्हणून उदयाला आलीत...

? संपूर्ण राज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या नवीन संधी विकसित करण्यात आल्या असून पर्यटन व संस्कृती विभागातर्फे नियमितपणे आयोजित केले जाणारे ‘दिपोत्सव’, ’रंगोत्सव’, ’देव दिवाळी’ नि ‘माघमेळा’ यासारखे कार्यक्रम देशी-परदेशातील पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षणे बनलीत...

संकलन : राजू प्रभू

Advertisement
Tags :

.