प्रथमेश फुगेची संधी हुकली
वृत्तसंस्था/ टॅलेक्सेला (मेक्सिको)
येथे सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताचा युवा तिरंदाजपटू प्रथमेश फुगेने पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी गमावली. दरम्यान या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या ज्योतीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारातील उपांत्य लढतीत विद्यमान विजेता मथायस फुलरटन आणि प्रथमेश फुगे यांच्यात कडवी चुरस पहावयास मिळाली. पण फुलरटनने फुगेला मागे टाकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या दोन्ही स्पर्धकांनी प्रत्येकी 150 समान गुण नोंदविले होते. त्यानंतर शूटऑफमध्ये प्रत्येकाला पुन्हा 15 अॅरोज देण्यात आले. त्यामध्येही दोघांनी 10-10 अशी बरोबरी साधली. पण अखेरच्या क्षणी डेन्मार्कच्या फुलरटनने फुगेला मागे टाकले. या लढतीत विजय मिळविला असता तर फुगेचे रौप्यपदक निश्चित झाले असते. पण आता त्याला कांस्यपदकासाठी लढत द्यावी लागणार आहे. दरम्यान कांस्यपदकाच्या लढतीत विश्वविजेत्या स्कोलसेरने फुगेचा 150-146 असा पराभव केला. महिलांच्या विभागात भारताच्या ज्योतीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. इस्टोनियाच्या मेरी पेसने ज्योतीचा 147-145 असा पराभव केला. आता या स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात भारताचे दीपिका कुमारी आणि धीरज बोमदेवरा सहभागी होत आहेत.