For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थंडीचे आव्हान

06:41 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
थंडीचे आव्हान
Advertisement

यंदा विक्रमी पावसाने देशभर दाणादाण उडवून दिल्यानंतर थंडीच्या कडाक्यानेही भारतीवासीयांना चांगलेच गारठवल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे देशातील तीन प्रमुख ऋतू. यातला थंडीचा मौसम हा सर्वांना हवाहवासा. प्रामुख्याने सुटीचे व पर्यटनाचे बेतही थंडीच्या या हंगामातच आखले जातात. गुलाबी थंडीचे वातावरण, त्यातील निसर्गाचे खुलणारे रूप सानथोरांसह सर्वांचेच मन आकर्षून घेते. किंबहुना, या वर्षीची थंडी मात्र काही औरच असल्याचे दिसून येते. अर्थात त्यातही पर्यटनाचा वा सफरीचा आनंद लोक घेत असले, तरी या थंडीने अनेकांच्या नाकात दम आणला आहे, हे मात्र नक्की. बोचरी, हुडहुडी भरवणारी किंवा हाडे गोठवणारी थंडी अशीही वर्गवारी आपण करत असतो. या वर्षाचा एकूणच आलेख पाहिला, तर गुलाबी, बोचऱ्या थंडीपेक्षा हुडहुडी भरवणाऱ्या व हाडे गोठवणाऱ्या थंडीचेच दिवस अधिक भरल्याचे लक्षात येते. उत्तर भारतासाठी थंडी नवी नाही. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या किंवा उत्तरेतील वाऱ्यांमुळे प्रभावित होणाऱ्या राज्यांमध्ये नेहमीच तापमानाचा स्तर खाली असतो. परंतु, यंदा वारंवार अनेक राज्यांमध्ये थंडीच्या लाटा थडकलेल्या पहायला मिळतात. सध्या हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. अनेक भाग धुक्याच्या चादरीने लपेटले आहेत. त्यामुळे या परिसरातील जनजीवनही विस्कळित झाले आहे. महाराष्ट्रात तर दसरा, दिवाळीपासूनच थंडीला सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे ही थंडी टिकून राहिलेली बघायला मिळते. एकीकडे पंजाबच्या हिस्सारमध्ये किमान तापमान 2.1 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमान सहा ते सात अंश सेल्सिअसपर्यंत खालावले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा सर्वाधिक कडाका आहे. किंबहुना, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्हेही थंडीने गारठले आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर हुडहुडीत गेल्यानंतर नव्या वर्षाचे स्वागतही देशवासियांनी थंडीच्या सहवासातच करावे लागेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यंतरी हवामान विभागाने थंडीविषयीचा आपला दीर्घकालीन अंदाज वर्तविला होता. त्यामध्ये यंदा थंडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सातत्याने थंडीच्या लाटा अनुभवायला मिळत आहेत. हवामान विभागाच्या अहवालानुसार पुढच्या दोन ते तीन दिवसांत उत्तर, मध्य भारतासह देशाच्या अनेक भागातील थंडी वाढणार आहे. अनेक भागांत धुके पसरेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. हे लक्षात घेता रात्रीच्या वा दिवसाच्या वेळी प्रवास टाळणे उचित ठरू  शकते. धुक्यामुळे आधीच अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुख्य म्हणजे अशा वेळी प्रवास करणे जोखमीचे असते. पुढच्या दोन ते तीन दिवसांतील अॅलर्ट पाहता काळजी घ्यावी लागेल. यंदा ला निना इफेक्टमुळे थंडीची तीव्रता अधिक असल्याचे सांगण्यात येते. साधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात थंडी वाढते. जानेवारीमध्ये मकरसंक्रांतीच्या काळात ती वरचे टोक गाठते. त्यानंतर फेब्रुवारीपासून हळूहळू तिचा कडाका कमी होतो, तर होळीपासून तिचा परतीचा प्रवास सुरू होतो, असे मानले जाते. हे बघता आणखी दोन महिने तरी थंडीचे असतील, हे लक्षात घ्यायला लागेल. थंडी हा खरेतर आरोग्यदायी ऋतू मानला जातो. शिवाय या मौसमात भूकही कडकडून लागते. त्यामुळे धष्टपुष्ट होण्याकरिता हा सर्वाधिक चांगला काळ मानतात. परंतु, सध्याचे थंडीचे दिवस आरोग्यदायी राहिलेले नाहीत. मुख्य म्हणजे शहरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तीव्र थंडीत वातावरणातील धुलिकण व कार्बनचे कण हे अधिक वर न जाता वातावरणातच अवतीभवती फिरत राहतात. त्यामुळे सर्वांनाच त्यांचा त्रास सहन करावा लागतो. परिणामी अस्थमा, दमा किंवा इतर श्वसनाच्या आजारांना आमंत्रण मिळते. मागच्या काही दिवसांपासून अनेक भागांत सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनची मोठी साथ आहे. संधीवात वा रक्तवाहिन्या किंवा हृदयाशी संबंधित त्रासही बव्हंशी याच काळात होतात. दाट धुके, थंडीचा कडाका अशा वातावरणात सकाळी लवकर उठून शाळेत जाण्याची कसरत विद्यार्थ्यांना दरवर्षी करावी लागते. मधल्या काळात शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. नव्या जीवनशैलीला अनुसरून सकाळी नऊपासून शाळा सुरू करण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सोडण्यात आले. त्यामागे विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळावी, हा हेतू होता. परंतु, त्याची अंमलबजावणी कधीच होऊ शकली नाही. प्रॅक्टिकली हे शाळांना शक्य नाही. याची अंमलबजावणी करायची झाल्यास संपूर्ण वेळापत्रकावरच त्याचा परिणाम होईल, येथपासून ते सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले आहे, येथपर्यंत अनेक मतमतांतरांचा गलबला झाला. पण, शेवटी सगळे थंड झाले. हे बघता उबदार कपड्यांनिशी थंडीशी सामना करीत शाळेची वाट धरणे, हेच विद्यार्थ्यांच्या हातात आहे. ऋतुनिहाय नैसर्गिक आपत्ती वा संकटांनाही माणसाला नेहमीच सामोरे जावे लागले आहे. उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटा अनेकांच्या जीवावर बेततात. पावसाळ्यातील ढगफुटी वा पूरस्थितीने दरवर्षी हजारोंचे प्राण जातात. त्याप्रमाणे बर्फवृष्टी, हिमस्खलन वा थंडीच्या तीव्र लाटेनेही अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. जम्मू काश्मीरसह उत्तरेतील भागात थंडीच्या मौसमात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. त्यामुळे पर्यटनावरही त्याचा परिणाम होतो. हे बघता सर्व शक्याशक्यतांचा विचार करून सर्वांना काळजी घ्यावी लागेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी व फेब्रुवारीमध्ये विदर्भ, दक्षिण कोकण, गोवा, उत्तर कर्नाटक, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, पूर्व राजस्थान, उत्तर गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि ओरिसाच्या काही भागात यंदा किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, दक्षिण गुजरातच्या भागात कमाल तापमानही सरासरीहून कमी राहणार आहे. मुख्य म्हणजे थंडीच्या लाटाही सरासरीपेक्षा अधिक असतील. हे लक्षात घेऊन या रफ अँड टफ थंडीशी लढण्यासाठी तितकेच सूक्ष्म नियोजन करावे लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.