For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळाबाह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आव्हान

10:17 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
शाळाबाह्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आव्हान
Advertisement

जिल्ह्यात 217 संख्या : ऊसतोड मजुरांच्या मुलांची संख्या अधिक : सर्वाधिक शाळाबाह्या विद्यार्थी निपाणी-चिकोडी तालुक्यांमध्ये

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात शाळाबाह्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये 217 विद्यार्थी शाळाबाह्या असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे शाळाबाह्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शिक्षण विभागाला कंबर कसावी लागणार आहे. यातील अधिकाधिक विद्यार्थी ऊसतोड कामगारांची मुले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी शाळेमध्ये दाखल न होता इतर कामांना जुंपले जात आहेत. विशेषत: ग्रामीण भागात वीटभट्टी, औद्योगिक वसाहती यामध्ये बालकामगारांना कामे दिली जात आहेत. त्यामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने ऑक्टोबरपासून शाळाबाह्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. घरोघरी जाऊन सर्व्हे करून विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्यात आली.6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 114 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 103 विद्यार्थी शाळेत दाखल झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बेळगावपेक्षा चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात शाळाबाह्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळाबाह्या विद्यार्थी निपाणी व चिकोडी तालुक्यांमध्ये आहेत.

मोठ्यांचे शिक्षण बंद करून लहानांना सांभाळण्याची जबाबदारी

Advertisement

काही कुटुंबांमध्ये मुलांची संख्या जास्त असल्याने मोठ्या मुलांचे शिक्षण बंद करून लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी दिली जात आहे. त्याचबरोबर ऊस गाळप हंगामामध्ये बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमधील ऊसतोड कामगार बेळगावमध्ये दाखल होतात. 3 ते 4 महिने ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीय जिल्ह्याच्या विविध भागामध्ये स्थलांतर करत असतात. हे विद्यार्थी शाळेत जात नसल्याने त्यांचीही गणना शाळाबाह्या विद्यार्थ्यांमध्ये केली जाते.

शाळाबाह्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने मागील दोन महिन्यांत शाळाबाह्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये काही तालुक्यात शाळाबाह्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मोहनकुमार हंचाटे (प्रभारी जिल्हाशिक्षणाधिकारी)

Advertisement
Tags :

.