वैश्विक संकटाची चाहूल
प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या एल निनोमुळे येत्या काही महिन्यांमध्ये जगभरात दुष्काळ, अतिवृष्टी, तापमानवाढ यांसारख्या तीव्र नैसर्गिक घटना वाढणार असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा अहवाल म्हणजे धोक्याचा इशाराच म्हणता येईल. मागच्या काही वर्षांत जागतिक तापमान वाढीची दाहकता सर्वच देशांना जाणवत आहे. येत्या काळात आतापर्यंतच्या सर्वात तापदायक वर्षांची नोंद होण्याचा डब्ल्यूएमओचा अंदाज म्हणजे वैश्विक संकटाची चाहूलच म्हणता येईल.
वामान हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा घटक होय. हवामानातील चढउतारांचे पर्यावरण, सजीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत असतात. मानवी जीवनाकरिता ऊन, पाऊस, थंडी, वारा या सगळ्यांची नितांत आवश्यकता असते. पाऊसपाणी ही तर माणसाची मूलभूत गरज. परंतु, पावसावर अनेक घटक परिणाम करतात. त्यातील एल निनोचे उपद्रवमूल्य मोठेच म्हणावे लागेल. यंदाचा एल निनो हा तर सुपर एल निनो ठरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतासह जगभर याविषयावर मंथन सुरू आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असून, लवकरच एल निनो आपला प्रभाव दाखविणार आहे. जून-ऑगस्ट 2026 दरम्यान एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता 80 टक्के, तर नोव्हेंबरपर्यंत सुरू राहण्याची शक्मयता जवळपास 90 टक्क्याहून अधिक आहे. त्यामुळे यावर्षी एल निनोची बाधा राहणार, हे गृहीतच धरायला हवे. मुख्य म्हणजे यंदाचा एल निनो केवळ भारतावरच नाही; तर जगभरातील हवामानावर परिणाम करणार आहे. यामुळे दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि मध्य आशियाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, तर मध्य अमेरिका, उत्तर दक्षिण अमेरिका, पॅरिबियन, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि दक्षिण आशियाच्या काही भागांमध्ये कोरडे हवामान, पावसाचा अभाव राहू शकतो. हे लक्षात घेता जगभरातील सगळ्याच खंडांमध्ये यंदा कमी अधिक प्रमाणात आपत्तीजनक स्थिती उद्भवण्याचा धोका आहे. मुख्य म्हणजे जून-जुलै-ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जगभरातील जवळजवळ सर्व भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. स्वाभाविकच उष्णतेच्या लाटांसह कोरडे हवामान व इतर धोक्मयांची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसतात. भारतासारखा देश सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. परंतु, एल निनोमुळे देशात 90 टक्क्यांपर्यंत पाऊस सीमित राहण्याचा सुधारित अंदाज आहे. कमी पर्जन्यमानाच्या स्थितीत दुष्काळाची शक्यता बळावते. जागतिक हवामान संघटनेचा अंदाज पाहता भारताबरोबरच अन्य देशांवरही दुष्काळाचे सावट पसरलेले दिसते. 2023-2024 मध्ये निर्माण झालेला एल निनो आतापर्यंतच्या पाच सर्वात तीव्र एल निनोंपैकी एक होता. या स्थितीमुळे 2024 मध्ये विक्रमी तापमानवाढ नोंदवली गेली. यंदाचा एल निनोदेखील सुपर एल निनो प्रकारातील असल्याने पुढच्या टप्प्यात तापमानवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित झाल्यास नवल नसेल. हे पाहता 2027 किंवा 2028 ही सर्वाधिक तापदायक वर्षे ठरू शकतात. मुळात मागच्या काही वर्षांत जागतिक तापमान वाढ वेगाने होत आहे. त्यामध्ये एल निनो अधिकची भर टाकत आहे. याचा मानवजातीवर सर्वात जास्त प्रभाव पडणार असल्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त होताना दिसते. 2030 पर्यंत जागतिक पृष्ठभागाजवळील सरासरी तापमान हे 1850 ते 1900 या कालावधीच्या तुलनेतील सरासरी पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. मुळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे दुष्काळ, महापूर, अन्नधान्य तुटवडा, महामारी, महागाई या आपत्तींसह जागतिक अर्थकारण बिघडण्याचाही धोका संभवतो. हे ध्यानात घेऊन कृती कार्यक्रमांवर भर द्यावा लागेल. हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासह अनेक उपाययोजना पॅरिस हवामान परिषदेत सुचविण्यात आल्या होत्या. त्या अंमलात आणण्यासाठी गांभीर्याने पावले टाकावी लागतील. मुख्य म्हणजे विकसित व विकसनशील राष्ट्रे असा कोणताही भेदाभेद न बाळगता सर्वांनी पर्यावरणाकरिता योगदान देणे, ही काळाची गरज आहे. सध्या जग वेगळ्या दुष्टचक्रातून जात आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालामुळे वैश्विक संकटाचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे सावध ऐका, पुढील हाका, हा दृष्टीकोन ठेऊनच मार्गक्रमण करावे लागेल.