विरोधकांचे नाही बंडखोरांचेच आव्हान
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. आघाडी आणि युतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाकडून अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच थेट एबी फॉर्मचे वाटप केले गेले, यापूर्वी उमेदवारी याद्या जाहीर होत असत, मात्र आता तिकीट वाटप करणे ही केवळ औपचारिक बाब न राहता, ती आता पक्षांतर्गत नाराजी, गटबाजी आणि थेट बंडखोरीचे कारण ठरत आहे.
2022 नंतर महाराष्ट्रातील बदललेल्या राजकारणामुळे कोणतीही निवडणूक ही आयपीएल सारखी होताना मैत्रीपूर्ण होताना दिसत आहे. ज्या ज्या उमेदवारांना संधी मिळालेली नाही, त्यांच्यासाठी अनेक पर्याय अजुनही उपलब्ध असल्याने आज शेवटच्या दिवशी ऐनवेळी मोठ्या प्रमाणात अन्याय झालेल्यांनी न्याय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, आत्तापर्यंत केवळ उमेदवारी न मिळालेल्यांची नाराजी बघायला मिळत होती. मात्र यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने पुण्याचे प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली तर काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्याने वर्षा गायकवाड नाराज झाल्या, त्यामुळे युती आणि आघाडीमुळे देखील पहिल्यांदा नेते नाराज झाल्याचे बघायला मिळाले.
महापलिका निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर होताना कधी नव्हे ते पहिल्यांदा नेते आणि कार्यकर्ते दोन्ही अस्वस्थ होताना दिसत आहेत. 2022 च्या महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होत असलेल्या या महापालिका निवडणूकीत, सर्व राजकीय गणिते बदलली आहेत. प्रचारापेक्षा तिकीट मिळवण्यासाठीच अधिक धावफळ सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कधी नव्हे त्या अभुतपूर्व बंडाळीचा सामना सर्वच राजकीय पक्षांना 2026 या नवीन वर्षाच्या सुरूवातीला करावा लागणार आहे. विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी न देणे, बाहेरून आलेल्या इच्छुकांना प्राधान्य देणे, तसेच सर्वेच्या नावाखाली घेतले जाणारे निर्णय यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना असून, त्यातूनच बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत. जिथे युती आघाडी झाली आहे तिथे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट मिळालेले नाही. तर जिथे स्वबळावर लढण्याचा निर्णय आहे, तिथे अंतर्गत संघर्ष वाढल्याचे बघायला मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणूकांचा विचार करता सर्वच पक्षात बंडखोरी वाढणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे, भाजपात विद्यमान नगरसेवकांना डावलल्याने त्यांनी थेट बंडखोरीचा इशारा दिला आहे. वॉर्ड 27 च्या भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी मतदारांना भावनिक पत्र लिहीत पाठिंब्याचे आवाहन केले आहे, तर काही दिवसापूर्वी पक्षात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर, तर सोमवारी शरद पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांना भाजपकडून उमेदवारी देखील जाहीर झाली आहे.
ठाकरे बंधूंसोबत गेलेल्या शरद पवारांची अवघ्या 10 ते 12 जागांवर बोळवण केली आहे. मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांना उमेदवारी मिळेल, मात्र त्यांच्या इतर समर्थकांचे काय? हा सवाल उपस्थित होत आहे. त्यात गेल्या महिन्याभरापासून या पक्षातून त्या पक्षात गेलेल्यांना देखील उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी देखील घरवापसी केली, मात्र तिथे सुध्दा तिकीट मिळत नसल्याने या उमेदवारांची अवस्था न घर का ना घाट का अशी झाली. घराणेशाहीचा प्रभाव या निवडणुकीत देखील जाणवला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटातून नवाब मलिक यांच्या कुटुंबातील 3 जणांना तर शिवसेना शिंदे गटातून सदा सरवणकर यांच्या मुलगा आणि मुलीला दोघांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपात उमेदवारी जाहीर होताना सर्वात जास्त अस्वस्थता उमेदवारांमध्ये असल्याचे बघायला मिळाले.
बंडखोरी वाढल्यास त्याचा थेट फटका अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. मतविभाजन होण्याचा धोका वाढत असून, याचा लाभ प्रतिस्पर्धी पक्षांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वेळा बंडखोर उमेदवार जिंकत नसले तरी निकालावर निर्णायक प्रभाव टाकतात, हे आधीच्या निवडणुकांतून स्पष्ट झालेले आहे. ही परिस्थिती ओळखून पक्ष नेतफत्वाकडून नाराजांची मनधरणी, तडजोडीचे प्रयत्न म्हणजे नवीन वर्षात नाराजांच्या नाकदुऱ्या काढून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान नेतृत्वासमोर असणार आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाचा पोतच 2022 नंतर बिघडल्याने नगरसेवक बनण्याची महत्त्वाकांक्षा आणि स्थानिक राजकारणातील प्रतिष्ठेचा मुद्दा लक्षात घेता, बंडखोरी पूर्णपणे रोखणे सोपे नाही, उमेदवारी नाकारल्याने भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमध्ये कार्यकर्त्यांनी घेराव घातला, तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्याबाबत देखील कार्यर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मनसे आणि शिवसेना युतीत उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत त्यांना गुंडाळल्याचे मनसे कार्यर्त्यांची भावना असून, मनसे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला किती सहकार्य करणार हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
तिकडे ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली असून, शिंदे सेना 81 ऐवजी 91 जागा लढणार आहे, तर कल्याण डोंबिवलीतही शिवसेना भाजप महायुतीत लढणार असून, नवी मुंबईत मात्र शिवसेना भाजपात समाधानकारक तोडगा न निघाल्याने शिवसेना भाजप स्वबळावर लढणार असल्याचे नक्की झाले आहे. कोणत्याच राजकीय पक्षाने स्वत:च्या उमेदवारांची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही, यावऊन किती मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते हे दिसते. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्याला जाण्यासाठीचे तिकीट आता एक वेळ कन्फर्म होऊ
शकेल मात्र महापालिका उमेदवारीचे तिकीट कन्फर्म होणे मुश्कील झाले आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर, पक्षातील नेत्यांबाबतच मोठे गौफ्यस्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षात पक्ष निष्ठेपेक्षा निवडून येण्याचे निकष, हाच एकमेव पर्याय तपासला जात आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी घेतलेले उमेदवारीचे निर्णयच पक्षांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात सर्वच पक्षांसमोर बंडखोरी रोखणे हीच खरी कसोटी ठरणार आहे. ती कशी रोखली जाते हे पाहावे लागणार आहे.
प्रवीण काळे