शहराचा मध्यवर्ती भाग 12 तास अंधारात
हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा : दहा गल्ल्यांमध्ये वीजपुरवठा ठप्प, नागरिकांचा संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवारी मध्यरात्री वीजपुरवठा ठप्प झाला. नागरिकांनी शेकडो तक्रारी करूनही वेळेत दुरुस्ती झाली नाही. बेळगावमध्ये दखल घेतली जात नसल्याने अखेर हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयात तक्रार करण्याची वेळ आली. सेक्शन ऑफिसर व साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील 10 गल्ल्यांमध्ये तब्बल 12 तास वीजपुरवठा ठप्प झाला होता.शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजता खडेबाजार, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, भोवी गल्ली, माळी गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, आझाद गल्ली, मेणसे गल्ली, खंजर गल्ली या परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला. ऐन उकाड्यात वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांनी हेस्कॉमच्या तक्रार निवारण केंद्रात फोन करून तक्रार मांडली. हेस्कॉमचे काही कर्मचारी रात्री दुरुस्तीसाठी दाखल झाले. परंतु त्यांना बिघाड सापडला नसल्याने पुन्हा माघारी फिरावे लागले. यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या विभागात अनेक दुकाने, गोडावून आहेत. वास्तविक पाहता सकाळी 10 पूर्वी दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे दुरुस्ती झाली नाही. पांगुळ गल्ली येथील गणपती मंदिरासमोर भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला होता. परंतु तो दुरुस्त करण्यास चालढकल करण्यात आली. यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांना वीजेविना रहावे लागले. महिला, वयोवृद्धांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले. काही रुग्णांची औषधे फ्रीजमध्ये ठेवावी लागतात. परंतु वीज नसल्यामुळे औषधे खराब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तक्रारीसाठी फोन केला असता फोन बाजूला काढून ठेवण्यात आल्याची तक्रारही नागरिकांनी केली. सेक्शन ऑफिसर सय्यद सिद्दिकी यांच्या गलथान कारभारामुळे दुरुस्तीसाठी इतका विलंब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली.
सक्षम अधिकाऱ्यांची गरज
शहराच्या मध्यवर्ती भागात कमर्शियल वीजग्राहक आहेत. त्यामुळे त्यांना सतत वीजपुरवठा देणे आवश्यक असते. परंतु सध्याचे सेक्शन ऑफिसर हे सक्षम नसल्याचे मागील अनेक घटनांतून दिसून येते. यापूर्वी दोनवेळा अशाच तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे शहरात सक्षम सेक्शन ऑफिसर व साहाय्यक कार्यकारी अभियंता असणे गरजेचे बनले आहे.