तिप्पट वेगाने काम करतेय केंद्र सरकार!
संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन, उद्योग-कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ल्ली
सध्याचे केंद्र सरकार देशाच्या विकासासाठी पूर्वीच्या दोन कार्यकालांच्या तुलनेत तिप्पट वेगाने काम करीत आहे. देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आणण्याचे या सरकारचे ध्येय असून ते वेगाने साध्य केले जाईल. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या तत्वावर हे सरकार कार्य करीत असून, विकास हेच प्राधान्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर अभिभाषण करताना केले आहे. त्यांच्या या अभिभाषणासह संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला.
अभिभाषणात राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात देशाने केलेल्या प्रगतीचा व्यापक आढावा घेतला आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि या योजनांमुळे समाजाचा झालेला लाभ यांचेही विवेचन त्यांनी केले. तसेच उद्योगधंद्यांची प्रगती, पायाभूत सुविधांचा विकास, कृषीक्षेत्र तसेच अन्य क्षेत्रांमधील सरकारच्या कामगिरीचीही माहिती त्यांनी या भाषणात दिली.
विविध योजनांमुळे लाभ
केंद्र सरकारने समाजातील दुबळ्या वर्गांच्या विकासासाठी विविध समाजकल्याण योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, म्हणून किसान सम्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 41 हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. गोरगरीबांच्या निवासाची सोय व्हावी, म्हणून आवास योजने आणण्यात आली असून तिचा व्यय 5 लाख 36 हजार कोटी रुपयांचा आहे, अशी भलावण त्यांनी आपल्या अभिभाषणात शुक्रवारी केली आहे.
दुधाच्या उत्पादनात अव्वल
आज भारत दुधाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. डाळी आणि मसाल्याचे पदार्थ यांचेही उत्पादन भारतात जगात सर्वाधिक होते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारने सातत्याने कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या श्रमाचा लाभदायक परतावा मिळणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पायाभूत सुविधांची प्रगती
या सरकारने प्रारंभापासूनच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. भारतीय रेल्वेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. लवकरच सरकार काश्मीरला रेल्वेने कन्याकुमारीशी जोडणार आहे. उधमपूर-बारामुल्ला-श्रीनगर या हा प्रकल्पाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. चिनाब नदीवरील सेतूही पूर्ण करण्यात आला आहे. भारताचा प्रथम रेल्वे केबल सेतू, अर्थात अंजी सेतूही पूर्ण झाला आहे. रेल्वेसमवेत महामार्गांची निर्मितही वेगाने होत आहे. देशाचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक कानाकोपरा महामार्गांनी जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला असून तो लवकरच पूर्ण केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेट्रोचा महत्वाचा टप्पा पार
नुकताच भारताने मेट्रोचा 1000 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. मेट्रोजाळ्याच्या संदर्भात आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश झाला असून भविष्यात मेट्रो हे नागरी प्रवासाचे मुख्य साधन बनणार आहे. अनेक शहरांमध्ये सध्या मेट्रोच्या विकासाची कामे होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
रोजगारनिर्मितीत भरारी
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांमुळे भारतातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. भारतीय उद्योगक्षेत्राच्या विकासासाठीही सरकारने अनेक योजना कार्यान्वित केल्या असून सहकार क्षेत्राच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकार जोमाने प्रयत्नशील आहे. सहकार क्षेत्राला बलवान करुन समाजाचा आधार बनविणे या योजनेवर सरकार काम करीत आहे. यातून चहुमुखी विकास साध्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले.
वक्फ विधेयकाची प्रंशसा
वक्फ मालमत्ता कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र सरकारने या सुधारणेला चालना देणारे विधेयक आणले आहे. या संदर्भात अत्यंत वेगाने सरकार प्रगती करीत आहे. ववफ सुधारणेची मागणी समाजाची असून सरकार या मागणीला न्याय देण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती त्यांनी दिली. वक्फप्रमाणेच ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेच्या संदर्भातही मोठी प्रगती साध्य झाली असून आज हा विषय मुख्य प्रवाहात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
370 गेल्याने स्थितीत सुधारणा
या केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ केला. याला मोठा लाभ त्या राज्याला झाला. आज तेथील जनता शांततेचा अनुभव घेत आहे. प्रगतीचे दरवाजे या निर्णयामुळे मोकळे झाले आहेत. या प्रदेशातील स्थिती आता सुधारली असून तो उत्तरोत्तर अधिक विकसीत होत जाईल. प्रगतीच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
इतर अनेक विषयांचा उल्लेख
आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयुषमान भारत योजना, छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी पतहमी योजना, पर्यावरण रक्षणाची मौसम अभियान योजना, दुर्गम भागातील लोकांना मुख्य आर्थिक प्रवाहाशी जोडणारी डिजिटल सखी योजना, ग्रामीण जीवन अभियान, कौशल्य विकास अशा अनेक अभिनव योजनांचे महत्व आणि त्यांच्यामुळे झालेली प्रगती यांचा आढावा घेतला.
काय बोलल्या राष्ट्रपती...
ड केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे विविध समाजांचे चहुमुखी कल्याण
ड सरकारच्या कामाचा वेग आणि दिशा यामुळे प्रगतीचा महामार्ग मोकळा
ड शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकास, कृषी विकासात मोठी प्रगती
ड अनेक अभिनव योजनांमुळे दुर्बळ घटकांच्या विकासातील अडथळे दूर