केंद्र सरकारमुळेच महागाईचा आगडोंब
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पत्रकारांशी बोलताना आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
महागाईविरुद्ध जनआक्रोश यात्रा काढण्याची नैतिकता भाजपला आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केंद्र सरकारमुळेच झाली आहे, असा पलटवारही त्यांनी शनिवारी बेळगावात केला. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या चिरंजीवाच्या लग्न समारंभात भाग घेण्यासाठी विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांचे शनिवारी सायंकाळी सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ कोण करते? केंद्र सरकारमुळेच ही दरवाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने दूध दरवाढ केली आहे, ही गोष्ट खरी आहे. वाढीव रक्कम सरकारच्या खजिन्यात येत नाही, उलट शेतकऱ्यांना जाते. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर प्रत्येकी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम केंद्र सरकारच्या खजिन्यात जमा होते. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 125 डॉलर प्रतिबॅरल कच्च्या तेलाचे दर होते. त्यावेळी पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर आताच्या दरापेक्षा निम्म्यावर होते. आता 65 डॉलर प्रतिबॅरल कच्च्या तेलाचे दर असूनही इंधन दरवाढ का केली? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
राज्य सरकारचा खजिना रिकामा झाला आहे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसा नाही, या भाजप नेत्यांच्या आरोपाकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार किंवा सामाजिक बांधिलकीपोटी दिली जाणारी पेन्शन थांबली नाही. याचाच अर्थ सरकारचा खजिना रिता झाला नाही, असा होतो. बी. एस. येडियुराप्पा, जगदीश शेट्टर व बसवराज बोम्माई आदी भाजप मुख्यमंत्र्यांच्या धोरणामुळेच आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
कर्नाटक सरकार कर्जबाजारी झाले आहे, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता कर्ज कोणी काढले नाही? काँग्रेसच्या राजवटीत स्वातंत्र्यानंतर 53 लाख 11 हजार कोटी रुपये कर्ज काढण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत 200 लाख कोटी कर्ज काढण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसवर टीका करण्याची नैतिकता भाजपकडे राहिली नाही, असा आरोप करतानाच जातनिहाय जनगणनेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केल्याशिवाय विधिमंडळात अहवाल मांडता येत नाही, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री भैरती सुरेश, आमदार अजय सिंग, माजी आमदार वीरकुमार पाटील, बुडा चेअरमन लक्ष्मणराव चिंगळे आदींसह इतर नेते उपस्थित होते.