मध्य विभागाचे जेतेपद दिवसाने लांबले
वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरु असलेल्या 2025 च्या क्रिकेट हंगामातील दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत 426 धावांपर्यंत मजल मारल्याने मध्य विभागाचे जेतेपद आता एका दिवसाने लांबले आहे. मध्य विभागाला विजयासाठी 65 धावांची गरज असून सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी ते विजयाची औपचारिकता करतील.
या सामन्यात दक्षिण विभागाने पहिल्या डावात 149 धावा जमविल्यानंतर मध्य विभागाने पहिल्या डावात 511 धावांचा डोंगर उभा केला. मध्य विभागाने पहिल्या डावात 362 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर दक्षिण विभागाने दुसऱ्या डावामध्ये दमदार फलंदाजी केली. 2 बाद 129 या धावसंख्येवरुन त्यानी रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. अंकित शर्मा आणि आंद्रे सिद्धार्थ या जोडीने 192 धावांची शतकी भागिदारी केल्याने मध्य विभागाला जेतेपदासाठी शेवटच्या दिवसाची वाट पहावी लागत आहे. दक्षिण विभागाच्या दुसऱ्या डावामध्ये मध्य विभागाचे फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय आणि सारांश जैन यांनी 7 गडी बाद केले.
अंकित शर्माने 168 चेंडूत 99 तर सिद्धार्थने 190 चेंडूत नाबाद 84 धावा झळकाविल्या. या जोडीने सातव्या गड्यासाठी 192 धावांची दमदार भागिदारी केली. दक्षिण विभागाची एकवेळ स्थिती 6 बाद 222 अशी होती. पण त्यानंतर सिद्धार्थ आणि अंकित यांच्या समायोचित फलंदाजीमुळे मध्य विभागाला डावाने विजय मिळविण्यापासून रोखले. मध्य विभागातील वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन हे या खेळपट्टीवर विशेष प्रभावी ठरले नाही. कुमार कार्तिकेयने 110 धावांत 4 तर सारांश जैनने 130 धावांत 3 गडी बाद केले. अंकितचे शतक केवळ एका धावेने हुकले. कार्तिकेयच्या गोलंदाजीवर तो पाटीदारकरवी झेलबाद झाला. अंकित बाद झाल्यानंतर मध्य विभागाच्या गोलंदाजांनी दक्षिण विभागाचे उर्वरित 3 गडी लवकर गुंडाळले. रविवारच्या खेळातील उपहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात दक्षिण विभागाने 120 धावा जमविताना 4 गडी गमाविले. रिकी भूई चहरच्या गोलंदाजीवर शिवम शर्माकरवी झेलबाद झाला. त्याने 45 धावा जमविल्या. कार्तिकेयच्या गोलंदाजीवर सिमरन 67 धावांवर झेलबाद झाला. कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन 27 धावांवर तंबूत परतला. सलमान निझार 12 धावांवर बाद झाला. दक्षिण विभागाचा दुसरा डाव 426 धावांवर संपुष्टात आल्याने मध्य विभागाला आता विजयासाठी 65 धावांची गरज आहे. मध्य विभागाचा संघ तब्बल 11 वर्षांनंतर पहिल्यांदा दुलिप करंडक जिंकण्याच्या समिप पोहोचला आहे.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण विभाग प. डाव 149, मध्य विभाग प. डाव 511, दक्षिण विभाग दु. डाव सर्वबाद 426 (अंकित 99, सिद्धार्थ 84, सिमरन 67, रिकी भूई 45, अझहरुद्दीन 27, कार्तिकेय 4-110, जैन 3-130).