धरणे भरली, पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू ! अलमट्टीतून ३ लाख विसर्ग करण्याची मागणी
सांगली प्रतिनिधी
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. अलमट्टी, कोयना व वारणेसह सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे महापुराचे संभाव्य संकट टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू करण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांसह ओढे नाल्यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. मंगळवारी महाबळेश्वरमध्ये 75, नवजामध्ये 55, कराडमध्ये 23 तर सांगलीत 15 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 100 टीएमसीच्या पुढे गेल्याने या धरणातून दहा हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वारणा धरणा टक्के भरले आहे. या धरणातून अडीच हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पाटबंधारेने कृष्णा आणि वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियांत्रित करणेसाठी मंगळवारी सायंकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 3 इंच उघडून सांडव्यावरून 10,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरण पायथा विद्युत गृहामधील 2,100 क्युसेक विसर्गासह कृष्णेत एकूण विसर्ग 12,100 क्युसेक्स करण्यात आला आहे.
याशिवाय वारणा धरणातून सुरू असलेल्या 2435 क्युसेक विसर्गात वाढ कऊन 3865 विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अलमट्टी धरण जवळपास 99 टक्के भरले आहे. या धरणात 98 हजार क्युसेक आवक असून दीड लाखांवर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यात महापुराचे संकट येण्याची भिती व्यक्त करत अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक विसर्ग करावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने केली आहे. समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.