काँग्रेस आठ फुटीर आमदारांचे प्रकरण पोचले उच्च न्यायालयात
पणजी : आमदार दिगंबर कामत यांच्यासह 8 फुटीर आमदार अपात्रताप्रकरणी दाखल केलेली याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळल्यानंतर काँग्रेस नेते डॉमनिक नोरोन्हा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत. सभापतींनी ही अपात्रता याचिका फेटाळणे म्हणजे घटनेची पायमल्ली असल्याने आपल्याला न्याय मिळावा अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. यामध्ये आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि ऊडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश होता. या आठ आमदारांनी त्यावेळी काँग्रेसच्या निवडून आलेल्या 11 आमदारांमध्ये आपला वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये सामील झाले होते. त्यांचा भाजप प्रवेश बेकायदेशीर असून घटनेच्या 10व्या अनुसूचित कलमनुसार त्यांना अपात्र ठरवावे म्हणून गिरीश चोडणकर यांनी याचिका दाखल केली होती. सभापतींनी 1 नोव्हेंबर रोजी ही याचिका फेटाळल्याने आता हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात पोचले आहे.