For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाडी सुटली रुमाल हलले...

06:30 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
गाडी सुटली रुमाल हलले
Advertisement

संदीप खरे, सलील कुलकर्णी यांच्या जोडीच्या सुरुवातीच्या काही फेमस गीतांमध्ये हे भलते अवघड असते.

Advertisement

कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना

डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना

Advertisement

डोळ्यातील अडवून पाणी हुंदका रोखूनी कंठी

तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते

हे गीत कॉलेजकुमारांचं खास आवडतं गीत होतं! त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ‘गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन ओले’ अशी सुंदर कविता कवितावाचन स्वरूपात सादर केली जायची आणि त्याच्यानंतर हे गाणं सुरू व्हायचं. त्या कोवळ्या नवथर बरीचशी प्रेम प्रकरणं होतात आणि संपूनही जातात. क्वचितच त्याच्यापैकी एखादा विषय शेवटपर्यंत टिकतो आणि ती जोडी लग्न करण्यात आणि चांगला संसार करण्यात यशस्वी होते. परंतु ज्याला काफ लव्ह म्हणतात ते पहिलं प्रेम त्या कॉलेजच्या दिवसात होत असतं. आणि असा प्रेमी किंवा प्रेमिका लवकरच साथीदाराला सोडून दूर जाण्याची वेळही येतेच. बहुतेक जणांचं शेवटचं वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना एकमेकांचा विरह सहन करायला लागतो. किंवा एखाद्याच्या आई-वडिलांची बदली झाली असेल तर मग आहे त्यावर्षीच कॉलेज बदलायची वेळ येऊ शकते. आणि अशावेळी लांब लांब निघून जाणाऱ्या आपल्या प्रेमीकडे बघून ही कविता सुचली असावी की काय असं वाटतं. पण आयुष्यात मुक्काम बदलणे, एक मुक्काम सोडून दुसऱ्या मुक्कामी जाणे हे बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यात चालतंच. सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी तर हा रिटायर होईपर्यंतचा सतत चालणारा एककलमी कार्यक्रमच होऊन जातो. सरकारी नोकऱ्यांमध्ये एका जागेवर त्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला फार काळ स्थिरावता येत नाही. शासनाने तशी सोयच केलेली असते की एका गावात स्थिरावून कर्मचारी आळशी होऊ नये किंवा सगळ्यांशी ओळखी वाढवून त्याचा गैरफायदा सगळ्यांनी घेऊ नये या सगळ्या गोष्टींसाठी सतत बदल्या करणे हे अस्त्र म्हणून वापरलं जातं. अर्थात विचारी माणसाला त्या गोष्टीतही संधी दिसत राहतेच. त्याचं कारण असं आहे. कितीही हौस असली तरी मुद्दाम बाहेर पडून आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या निरनिराळ्या भागात फिरायला जाणे हे थोडं अवघडच असतं. परंतु बदल्यांच्या निमित्ताने कुटुंबकबिला घेऊन फिरणं जड जरी असलं तरी पण माणसाला आपल्या राज्याचे किंवा देशाचे निरनिराळे भाग पाहता येतात. पद्धती, चालीरीती, बोलीभाषा आणि संस्कृती याची ओळख सुद्धा होत असते. चतुर, विचारी माणूस किंवा अभ्यासू माणूस या सगळ्याचा वापर करून आपलं आयुष्य सांस्कृतिक दृष्ट्या अधिक समृद्ध करतो. बारा गावचं पाणी प्यायलेला माणूस आपोआप शहाणा बनतो असं आपल्याकडे म्हणतात. ‘केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार’ असंही म्हटलं जातं. मुद्दाम ते करायला कोणी उत्सुक असेल असं नाही. पण या सक्तीच्या पर्यटनामुळे आपोआपच माणसाकडे एक प्रकारचा शहाणपणा आणि मुरब्बीपणा येत जातो. शिवाय प्रत्येक ठिकाणी आपलं सगळं सामान घेऊन जायचं पूर्वीच्या ठिकाणाहून सर्व सामान मुलंमाणसं शिस्तीत हलवायची आणि नवीन ठिकाणी आणून पुन्हा आपलं सगळं बस्तान नव्याने मांडायचं यासाठी माणसात चटपटीतपणा लागतो. न कंटाळता एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची सवय लागते.

मुळात माणसाला स्थैर्य आवडतं आणि अशा प्रकारच्या नोकरी व्यवसायामध्ये नेमकं तेच नसतं. पण आर्थिक स्थैर्य लाभायचं असेल तर मग एका ठिकाणी राहण्याचं स्थैर्य मिळेलच असं नसतं. हे झालं नुसत्या सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीतलं पण आजकाल कॉर्पोरेटच्या नोकऱ्यांमध्ये तर सतत ऑनसाईट पाठवलं जातं की त्यामुळे देश सोडून सततच परदेशात जावं यावं लागतं. हा भ्रमणयोग जो असतो तो इतका गमतीशीर असतो की कॉर्पोरेट मध्ये असणाऱ्या लोकांची आणि कलाकार मंडळींची घरात एक बॅग सततच भरलेली असते. रोज उठून नवीन ठिकाण. रोज उठून नवीन प्रवास! या सततच्या प्रवासामुळे कलाकारांना काही गमतीशीर नांवे सुद्धा पडतात. उदाहरणार्थ आदरणीय निवृत्तीबुवा सरनाईक यांना भ्रमणयोगी असंच नाव पडलेलं होतं. किंवा पु ल देशपांडे गमतीने पंडित भीमसेन जोशींना ‘सवाईगंधर्वांचे शिष्य हवाईगंधर्व’ असं म्हणायचे. कारण पंडितजींचा कार्यक्रमांच्या निमित्ताने विमान प्रवास सततच होत राहायचा. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या बाबतीत सुद्धा पुलंनी असंच म्हटलेलं आहे की फार मोठ्या संसाराचा गाडा त्यांनी तंबोऱ्याच्या चार तारांना सोबत घेऊन ओढलेला आहे. हे कुटुंब असंच हसतंखेळतं ठेवण्यासाठी सतत प्रवास करावा लागे. सतत पक्षिणीसारखी भ्रमंती त्यांना करावी लागे. घराच्या एका कोपऱ्यात भरलेला होल्डॉल सतत तयार असायचा. किती मार्मिक शब्दात त्यांच्या नशिबाला असलेला सततचा प्रवास त्यांनी अधोरेखित केला आहे! बरं हा प्रवास किंवा हे सोडून जाणं पुन्हा नवीन ठिकाणी जात राहणं हे सगळ्यांसाठी सारखं नसतं. काही वेळा

मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना

मुझे चलते जाना है बस चलते जाना

असा न संपणारा प्रवासही एखाद्याच्या नशिबी येऊ शकतो. अर्थात ‘परिचय’ या सिनेमामधल्या नायकासारखंच नशीब एखादं अप्रतिम दान या प्रवासांती देऊसुद्धा शकतं. ज्याचं त्याचं दैव. दुसरं काय?

या सगळ्या प्रकारात सर्वात अवघड जर काय असेल तर ते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पहिल्या लोकांचा निरोप घेणं. तिथे आता ओळख झालेली असते. लोकांशी संवाद घडलेले असतात. गावातल्या वाटा रस्ते ओळखीचे असतात. ज्या जागेत राहत असतो त्या जागेशी आपलेपणा जोडला गेलेला असतो. माणसांचीच कशाला निर्जीव वस्तूंची, जागेची, भोवतालच्या बागेची, अगदी आपल्या कार्यालयातल्या आपल्या बसण्याच्या जागेची सुद्धा सवय झालेली असते. पण आता एकाएकी ते सगळंच आपल्याला परकं झालेलं असतं. आपल्या जागी कोणीतरी दुसरा नियुक्त होणार असतो. आपल्याला त्या जागेमधून रिलीव्ह केलं गेलेलं असतं. आता ती जागा सोडायची आणि दुसऱ्या ठिकाणी नेमणूक केलेली जागा आपली वाट पाहते आहे आणि लवकरात लवकर आपल्याला तिथे जाऊन हजर व्हायचं आहे. या दोन टप्प्यांमधला जो काळ असतो तो अतिशय नाजूक आणि हळवा असतो. संवेदनशील कोणत्याही माणसाला तो जाणवल्याखेरीज राहत नाही. मग गावात ओळखीच्या सर्व ठिकाणी निरोपाची जेवणं होतात. तिथे झालेले सखे सुहृद भेटायला येतात. घरात भेटवस्तूंचा आणि खाऊ ढीग जमा होतो. आणि या सगळ्यांना परतभेटी द्यायचीही जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. एक तर सगळ्या सामानाची बांधाबांध सुरू असते. अलीकडच्या काळात ती करून देणाऱ्या कंपन्याही जन्माला आल्यामुळे ते काम बरंच सुकर होतं. पण घर म्हटल्यानंतर किती काड्या उचलल्या तरी शेवटची काडी शिल्लक राहतेच. सगळं सामान पॅक होऊन गेल्यानंतर सुद्धा मग कधीतरी आपल्या लक्षात राहतं की हे राहिलं, ते राहिलं, काहीतरी शिल्लक राहिलं. सगळं काही गोळा केलं जातं. सगळं काही दुसऱ्या ठिकाणी काळजीपूर्वक पाठवलंही जातं. शेवटी मिळालेली जागा बंद करून मुला माणसांसोबत आपण पुढच्या ठिकाणी जायला निघतो. जुन्या जागेला कुलूप लावलं जातं आणि घशाशी आवंढा येतो की अमुक वर्षं आपण या ठिकाणी राहिलो. इथल्या लोकांची ओळख करून घेतली. या जागेशी असलेले आपले ऋणानुबंध आता संपले. आता पुन्हा एकदा दुसरीकडे आपल्याला चूल मांडायची आहे. ते रिकामं घर आपल्याला खुणावीत राहतं. रिकाम्या खोल्यांमध्ये फिरणारी हवा बोलवत राहते. कुलूप लावलेल्या घराच्या बंद दारामागे काय चालू असेल असा प्रश्न आपल्या मनाला पडतो. आता ते घर रिकामं असणार असतं. दुसरं कोणी तिथे येईपर्यंत त्या घराचा कानाकोपरा रिता राहणार असतो. आणि त्या रित्या कोपऱ्यातला सगळा रितेपणा आपल्या मनातही दाटून आलेला असतो. रितं होऊन सुद्धा मन इतकं जड असू शकतं ते तेव्हा कळतं. डोळे पुसत आपण गाडीत बसतो. नव्या गावी जायला निघतो. तिथे गेल्यावर ती कुटुंबाची व्यवस्था कशी लावायची, मुलांच्या शाळा कशा शोधायच्या, घर लावायचं कसं या विचारात आपण बुडून गेलेले असतो. गाडी सुटताना एकवार आपण त्या जुन्या जागेकडे, जुन्या इमारतीकडे, आधीच्या सगळ्या लोकांकडे डोळे भरून बघून घेतो. काहीतरी कायमसाठी त्यावेळी आपल्या पोटात तुटलेलं असतं. कसं आणि काय ते सांगता येत नसतं एवढं खरं! जाती पावलं जाणोत आणि रितं घर जाणो. गाडी सुटलेली असते.

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.