राजधानी सातारा झाली शिवमय
सातारा :
पुणे येथे तयार करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जपान येथील टोकिओ येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याच मूर्तीची भव्य शिवस्वराज्य यात्रा राजधानी साताऱ्यात बुधवारी सायंकाळी 5 वाजता काढण्यात आली. त्या रथयात्रेला गांधी मैदान येथून मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. सजवलेल्या घोड्यावर पारंपारिक वेषभुषेतील युवती, शाळा, कॉलेज, अॅकॅडमीचे विद्यार्थी, शिवभक्त यांच्या सहभागाने ढोलताशाच्या वाद्यात, चित्तथरारक खेळ करत पोवाड्याच्या चालीवर रथयात्रा सायंकाळी उशिरा शिवतीर्थ येथे पोहोचली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, राजू गोरे, शेखर मोरे पाटील, शरद काटकर, विनोद कुलकर्णी, हरीष पाटणे, अॅड. प्रशांत नलावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या तालावर ढोलताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात रथाची मिरवणूक निघाली.
या मिरवणुकीत लहानग्यांनी चित्तथरारक खेळ करत लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थींनीनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. ही मिरवणूक राजवाडा, गांधी मैदान, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद मार्गे खालच्या रस्त्याला पोलीस मुख्यालय मार्गे गिते बिल्डींग मार्गे शिवतीर्थावर पोहोचली. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन पुढे ही यात्रा पुण्याच्या दिशेने रवाना झाली.