प्रचार संपला आता काऊंटडाऊन सुरू
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा अखेर सोमवारी थंडावल्या, गेली 15 दिवस चाललेला प्रचाराचा खणखणाट संपला असून, बुधवारी 288 जागांसाठी मतदान होत आहे.राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसने आपल्या देशातील नेत्यांची तगडी फौज महाराष्ट्रात उतरवली होती, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळत चांगले वातावरण निर्माण केले, आता कोण किती जागा लढवतो यापेक्षा कोण किती जागा जिंकतो, यावर युती आणि आघाडीतील मोठा भाऊ कोण हे ठरणार आहे. महिला मतांची जादू या निवडणुकीत महाराष्ट्रात महत्त्वाची ठरणार आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी सगळ्याच अंगाने वेगळी ठरत आहे, शाश्वत विकासापेक्षा व्होट जिहाद,मोफत वीज योजना, मोफत शिक्षण, आरक्षण या विषयांवरच निवडणुकीचा प्रचार गाजला. या निवडणुकीत शेती, महागाई, बेरोजगारी या प्रश्नांवर कुठलीच चर्चा होताना दिसली नाही. अखेरच्या टप्प्यात सोयाबीनचा प्रश्न जवळपास 75 मतदारसंघांत निर्णायक ठरत असल्याचे लक्षात येताच,याबाबत आश्वासन देण्यात आले. बटेंगे तो कटेंगे ,एक है तो सेफ है भाजपच्या या घोषणेने शेवटी शेवटी चांगले वातावरण निर्माण केले, मात्र दुसरीकडे भाजपला रामाच्या नावाचा विसर या निवडणुकीत झाल्याचे बघायला मिळाले. यंदाच्या प्रचारात महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना ही केंद्रस्थानी होती,महिलांचे मतदान हे या योजनेमुळे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहीण योजनेसारखीच महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या नावाने सरकार आल्यावर तीन हजार ऊपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीच्या निमित्ताने केवळ रेवड्यांची घोषणा करण्यात आली.एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती अशी लढत होत असताना मनसेने यावेळी निवडणूक गांभीर्याने घेतल्याने मनसे फॅक्टर पुन्हा एकदा या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे, जवळपास 288 मतदारसंघांत तगडे अपक्ष उमेदवार उभे आहेत, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे मतांचे विभाजन झाल्यास अपक्ष उमेदवाराला मोठा लाभ होऊ शकतो, हेच हेऊन या निवडणुकीत अपक्षांना निवडून आणण्याची जबाबदारीही काही पक्षांनी घेतली असून, त्यांना छुपी मदत केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,अपक्ष आमदार हे कोणाबरोबर जातात,कोणाचे सरकार बनवतात हे निकालानंतरच कळेल मात्र या निवडणुकीत एकमात्र नक्की अपक्षांचे सरकारमधील महत्त्व वाढल्यास सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह कायम असणार आहे, 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले वेगवेगळे प्रयोग बघता, आता लोकांना काही, वेगळं घडल्यास अप्रुप वाटणार नाही.एकीकडे बंडखोरी आणि घराणेशाहीने या निवडणुकीत युती आणि आघाडीला घेरले आहे, एकाच घरातील दोन भाऊ वेगवेगळ्या पक्षातून तर मुलगी पहिल्यांदा बापाच्या विरोधात उभी ठाकली असल्याचे बघायला मिळाले. तेच तेच प्रस्थापित, पुन्हा पुन्हा तीच घराणे आणि तेच उमेदवार, दुसरी, तिसरी पिढी, चौथी पिढी यांच्याशिवाय कोणी सर्वच पक्षात उमेदवार दिसत नव्हते.लोकसभेला पराभव झालेले आता विधानसभा निवडणूक लढविताना दिसत आहेत. राम सातपुते, मिहीर कोटेचा तिकडे विधानपरिषदेवर असलेल्या भावना गवळी, गोपीचंद पडळकर,तर राज्यसभेवर असलेले मिलिंद देवरा हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यामुळे राजकारण हे क्षेत्र काही ठराविक घराण्यांची मक्तेदारी झाल्याचे बघायला मिळत आहे, नगरचे सुजय विखे-पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती, मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारले.सर्वच प्रमुख पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही असल्याचे या निवडणुकीत बघायला मिळाले.लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास गमावलेल्या महायुतीला ही विधानसभेची निवडणूक सोपी असेल, असे वाटत नव्हते ,मात्र त्यानंतर लाडकी बहीण सारखी योजना जाहीर करणे, आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करणे हे सरकारच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे.
गेली अनेक निवडणुका भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या भाजपने देखील लाडकी बहीण योजनेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले, 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन सारखी योजना, अशा योजनेच्या माध्यमातून महिला आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून महायुतीने प्रचार केला, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका न करता काँग्रेसला लक्ष्य केले, तर शरद पवारांनी प. महाराष्ट्रात सभांचा धडाका लावताना कधी नव्हे ते आक्रमक होत मतदारांना साद घातली. दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघातील सभेत बोलताना पवारांनी वळसे-पाटील गद्दार आहे, त्यांना पाडा, माझे मानसपुत्र आहे असे बोलतात मात्र आमचे कोणतेही कौटुंबिक संबंध नसल्याचे सांगताना मतदारांना भावनिक साद घातली. पवार इतके आक्रमक कधीच दिसले नव्हते, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात सभेत बोलताना वेळ पडली तर भाजपशी बोलू पण यांना पाडा असे म्हटले, त्यामुळे या निवडणुकीत मंत्र्यांसमोर देखील पुन्हा निवडून येण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
एकीकडे खरी शिवसेना कोणाची तर दुसरीकडे खरी राष्ट्रवादी कोणाची हा निकाल या निवडणुकीत लागणार आहे, त्यामुळे ही निवडणूक वादळी होणार यात काही शंका नाही, उद्या मतदान होणार आहे. प्रत्येक मतदार संघात काटे की टक्कर होणार असल्याने आता दोन दिवस उमेदवारांना वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यत पोहचण्याचे आव्हान असणार आहे, शेवटी प्रचारात कोणी किती आघाडी घेतली यापेक्षा प्रचार संपल्यानंतर कोण लोकांपर्यत पोहचण्यात आघाडी घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदार महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर बोलत असला तरी, नेत्यांची चर्चा केवळ आश्वासन आणि मोफत योजनांचीच होती, आता मतदार या गाजराला भुलणार की मूळ मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरेल हे नेमकेपणाने सांगता येत नाही.
प्रवीण काळे