बिहारमधील प्रचारतोफा थंडावल्या
दुसऱ्या व अंतिम टप्प्यात 122 जागांसाठी उद्या मतदान : 1,302 उमेदवार रिंगणात : शुक्रवारी मतमोजणी
वृत्तसंस्था/ पाटणा
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बिहारमध्ये सुरू असलेल्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील जाहीर प्रचार रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक सभा घेतल्या. तसेच संजद आणि राजद या स्थानिक पक्षाच्या नेत्यांनीही शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांवर आगपाखड करण्याची संधी सोडली नाही. आता सोमवारी छुपा प्रचार सुरू राहणार असून मंगळवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 11 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर आणि 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालावर लागलेले असेल.
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 122 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी गयाजी, कैमूर, रोहतास, औरंगाबाद, अरवल, जहानाबाद, नवादा, भागलपूर, बांका, जमुई, सीतामढी, शिवहार, मधुबनी, सुपौल, पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज, पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण येथे मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या टप्प्यात एकूण 1,302 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1,165 पुरुष, 136 महिला आणि एक ट्रान्सजेंडर उमेदवाराचा समावेश आहे. या टप्प्यात 3.70 कोटीहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र असून त्यात 1.95 कोटी पुरुष आणि 1.74 कोटी महिलांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात अंदाजे 65.08 टक्के मतदान झाले. यामध्ये समस्तीपूरमध्ये सर्वाधिक 71.74 टक्के मतदान झाले. राजधानी पाटणा येथे सर्वात कमी 59.02 टक्के मतदान झाले.
भाजप नेत्यांची प्रचारात आघाडी
गेल्या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरात अनेक सभांना संबोधित केले. तसेच अमित शाह यांनीही बऱ्याच सभांना संबोधित केले. ते गेल्या तीन दिवसांपासून राज्यात तळ ठोकून आहेत. शुक्रवारी जोरदार प्रचार सुरू केल्यापासून निवडणूक प्रचाराच्या अंतिम तारखेपर्यंत ते सभांना संबोधित करत होते. तसेच त्यांचा एक भव्य रोड शो आयोजित केला होता. रविवारी त्यांची पहिली सभा सासाराम येथील फजलगंज स्टेडियमवर तर दुसरी जाहीर सभा अरवल येथील मधुशर्मा मेळा मैदानावर संपन्न झाली. दरम्यान, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारमधील किशनगंज येथे जाहीर सभा घेतली.