For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

वादळापूर्वीची शांतता...!

06:20 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
वादळापूर्वीची शांतता

निवडणुका घोषित झाल्या. आचारसंहिता लागू झाली. काही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या पहिल्या, दुसऱ्या नावांची घोषणा केली. जागावाटप उमेदवारी आणि आघाड्या यामध्ये वातावरण स्वच्छ नाही. वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळे उमेदवार व पक्ष दावे करत आहेत. सांगलीची जागा तर सोनिया गांधींच्या दरबारी जाऊनही निकाली निघालेली नाही. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेस बैठकीला गैरहजर राहण्याचे पत्र पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे. सातारा असो माढा असो मुंबईतले काही मतदारसंघ असोत कोकणातील एका जागेचा वाद असो बैठका मागून बैठका होत आहेत. पण समाधान निघत नाही. ओघानेच  निवडणुकीचे रणशिंग वाजले तरी लढाई सुरु झालेली नाही. यंदा महाराष्ट्रात तर सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचाही फटका असेल पण निवडणूक वातावरण थंड-थंड आहे हे वास्तव स्पष्ट जाणवते आहे. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी. भाजपाने अब की बार चारसो पार घोषणा दिली आहे. ती पूर्ण करण्यासाठी भाजपला दक्षिणेतील राज्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. महाराष्ट्राचा कौल कोणाला यावरही बरेच अवलंबून आहे.  भाजपच्या चारसो पार घोषणेला काऊन्टर अॅटॅक करताना उद्धव ठाकरे यांनी अब की बार भाजप हद्दपार असे म्हटले आहे. निवडणुकीत असे शब्दछल सुरुच राहणार तथापि निवडणूक जाहीर झाल्यापासून जी शांतता जाणवते आहे त्यामुळे अनेकांना बेचैनी आहे. लोकसभा निवडणूक तीन-चार टप्प्यात होत असे महाराष्ट्रात तर दोन टप्प्यात प्रमुख सर्व मतदार संघ आणि शेवटचा तिसरा टप्पा नक्षलवादी भागातील असा शिरस्ता होता. पण यंदा सात टप्पे म्हणजे ‘थंडा करके खावो’ चा कळस मानला जातो आहे. टप्पे वाढले की त्या मतदारसंघात रसद पुरवता येते. नेत्यांच्या सभा होतात, शक्ती एकवटते व यश खेचून आणता येते असे त्यामागचे साधे-सरळ गणित जोडीला प्रशासनाला, पोलीस दलालही बरे पडते. राज्यात गेले काही महिने रोज एकमेकांवर खालच्या भाषेत टिका-टिप्पणीचा सिलसिला सुरु आहे व होता. कुणी पक्ष सोडला, कुणाची भानगड बाहेर आली. कुणावर ईडीची कारवाई झाली. रात्री अंधारात कोण कुणाला भेटले अशा रोज बातम्या असायच्या. लोकांना या करमणुकीचे व्यसन जडले होते. पत्रकार परिषद, गाठीभेटी, कारवाया यांची भरपेट मेजवानी नियमित असे. किरीट सोमय्या, संजय राऊत, निलेश राणे, सुषमा अंधारे, भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे वगैरे मंडळी रोज या राजकीय जत्रेत रमताना व कमी-अधिक भर घालताना दिसत होती. मनसे नेते राज ठाकरे यांनी या साऱ्याला राजकीय चिखल म्हटले पण ही धुळवड थांबली नाही. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, रासप नेते महादेव जानकर यामध्ये भरच घालताना दिसत होते. पण निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता लागू झाली आणि एक कमालीची शांतता जाणवत आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे की आचारसंहिता व निवडणुकीचे अनेक टप्पे यांचा परिणाम आहे समजत नाही. पण मनोज जरांगे पासून छगन भुजबळपर्यत आणि रामदास आठवलेंपासून सुषमा अंधारेंपर्यंत सारे शांत दिसत आहेत. मतदान व निवडणूक अनेक टप्प्यात होणार त्याचा फायदा कोणाला यावरही चर्चा-चिंतन सुरु असले तरी ओघानेच ज्याची शक्ती मोठी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांना वाढीव टप्प्याचा लाभ होणार हे स्पष्ट आहे. भाजपासारखे राष्ट्रीय पक्ष आणि ज्या-त्या राज्यात समर्थन असलेले प्रादेशिक पक्ष यांना या वाढीव टप्प्याचा लाभ होणार हे वेगळे सांगायला नको. महाराष्ट्र दुरंगी की तिरंगी लढत होणार हे बघावे लागेल. भीमशक्ती-शिवशक्ती यांची युती झाली असे उद्धव ठाकरे व बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्तपणे जाहीर पेले होते. आता ही युती अस्तित्वात नाही. आंबेडकर यांचा टक्का राज्यात विजयाचे गणित बदलण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण आंबेडकरांना कुणी गृहीत धरु शकत नाही. प्रस्थापित विरोधी वंचितांचा आवाज म्हणून त्यांच्या पक्षाकडे पाहिले जाते. भले त्यांचे आमदार-खासदार नसोत पण त्यांचा चाहता वर्ग आहे. जे राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात स्थान आहे तसेच राजकारणात प्रकाश आंबेडकर यांचे स्थान आहे. महादेव जानकर यांचाही काही मतदार संघात प्रभाव आहे. विशेषत: बारामती, माढा, सोलापूर, परभणी येथे त्यांचे समर्थक आहेत. ओघानेच महादेव जानकर काय करतात, प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका घेतात, मनोज जरांगे कुणाला साथ देतात आणि राज ठाकरे गुढी पाडव्याला कोणती घोषणा करतात हे महत्त्वाचे. सर्व नद्या सागराला मिळतात तसे महाराष्ट्राचे राजकारण फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शिजते आहे. फडणवीस यांनी अनेकांना अनेक आश्वासन देऊन सोबत घेतले आहे. त्यामुळे अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्यापासून महादेव जानकर, सदाभाऊ खोत अशा सर्वांना सांभाळणे सोबत ठेवणे ही तारेवरची कसरत आहे पण ते ही कसरत करत आहेत. बारामतीत विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांना त्यांनी सुमित्रा पवार यांच्या प्रचाराला लावले आहे. महादेव जानकरांना त्यांनी महायुतीत सहभागी करुन घेतले आहे व सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आहेतच. हे कसब निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरते पण त्याचा परिणाम शेवटी मतमोजणीनंतरच पुढे येतो. शिवसेनेत फूट पडल्यावर विद्यमान आमदार, खासदार, पक्षचिन्हासह नावासह एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यांचा फटका उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसतो आहे. चांगले उमेदवार हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. तिच गोष्ट शरद पवार यांच्या पक्षाची आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे उमेदवार ठरत नाहीत. जागा वाटप झाले असले तरी उमेदवार आणि साथीदार ठरत नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचे सुतोवाच केले आहे. ते तसे लढले तर ते भाजपाची बी-टीम ठरतात ते ठाकरे-पवार यांच्यासोबत गेले तर ते पुरोगामी ठरतात. त्यांना सोयीची लेबले लावली जातात. पण त्यांचे समर्थन महत्वपूर्ण व विजयासाठी महत्त्वाचा टक्का ठरणारे आहे. ओघानेच प्रकाश आंबेडकर काय करतात हे महत्त्वाचे. तूर्त शांतता दिसते आहे. चिखलफेक मंदावली आहे. निवडणुकीचा बिगूल वाजला असला तरी सैन्य मैदानात उतरलेले नाही. कोण कोणासोबत हे ठरलेले नाही. सारे थंड-थंड, हळूहळू सुरु आहे. पण ही लढाई निकराची होणार आहे. विशेष करुन शरद पवार, उद्धव ठाकरे यांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. एकूणच वादळापूर्वीची शांतता आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.