रुग्णसेवेचा भार निम्म्या परिचारिकांवरच
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
जिल्ह्यातील सर्वच शासकीय रूग्णालयांसह नगरपालिका, महापालिका, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयात परिचारीकांची कमतरता आहे. निम्म्या परिचारीकांवरच रूग्णसेवेचा भार Dिासल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वीस वर्षात आरोग्य सेवेत आधुनिकीकरण, रूग्णालयातील विभागांचा विस्तार, नवीन तंत्रज्ञ विकसित होत आहे. रूग्ण संख्येतही दुपटीने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत परिचारीकांची पदोन्नती व नवीन परिचारीका भरतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रूग्णावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांसह त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या परिचारीकाही महत्वाची भुमिका पार पाडत असतात. मात्र, जिथे 10 परिचारीकांची गरज आहे तिथे 5 ते 6 परिचारीकांवरच रूग्ण सेवा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून परिचारीकांच्या पदोन्नतीचा प्रश्नही अधांतरीतच आहे. जिल्ह्यात 11 ग्रामीण रूग्णालये आहेत. येथे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत परिचारीकांनाच रूग्णसेवेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. काही रूग्णालयात वॉर्डबॉयची भरती नसल्यामुळे त्यांचेही काम परिचारीकांनाच करावे लागत आहे. परिचारीकाला रजा घ्यायची झाल्यास दुसऱ्या परिचारीकेला डबल ड्युटी करावी लागत आहे.
सीपीआरचे मेडिकल कॉलेज झाले तेंव्हापासून ग्रामीण परिचारीकांना सेवेसाठी घेतले होते. अद्यापही जुन्याच आकृतीबंधाप्रमाणे भरती केली जात आहे. राज्यात पदोन्नती व पद भरती होत नसल्यामुळे परिचारीका संघटनांना आंदोलने करावी लागत आहेत. राज्य परिचारीका संघटनेने कामबंद आंदोलन सप्ताहभरापुर्वी केले होते. मात्र, केवळ आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडत नसल्याची खंत परिचारीकांतून व्यक्त केली जात आहे.
- ‘सीपीआर’चा विस्तार झाला, परिचारीका भरती नाहीच
सीपीआरमध्ये नियमानुसार 1100 परिचारीकांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, 450 परिचारीकांवर काम सुरू आहे. यातील 40 परिचारीकांचे प्रमोशन झाले आहे. वीस वर्षाच्या तुलनेत सीपीआरमध्ये विभाग वाढले, बेडची संख्या वाढली, मेडिकल कॉलेज सुरू झाले, डॉक्टरांची संख्या वाढली, मात्र परिचारीका तेवढ्याच राहिल्या. सीपीआरमधील रूग्ण संख्याही दुपटीनें वाढली आहे. रोज 1000 ते 1500 रूग्ण तपासणीसाठी येतात. 200 रूग्ण दाखल होतात. एकूण 18 इमारती, 36 विभाग व ओपीडींची संख्याही अधिक आहे. रूग्णसेवेचा भार वाढत असताना परिचारीकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
- पंचगंगा हॉस्पिटलमध्ये परिचारीकांना रजा मिळणे मुश्किल
पंचगंगा हॉस्पिटलमध्ये रोज 50 गर्भवतींची तपासणी होते. सोमवारी 60 ते 70 रूग्णांची नोंद होते. बुधवारी 100 ते 120 गर्भवतींची तपासणी होते. रोज किमान 5 ते 6 प्रसुती होतात. सध्या, येथे एकूण 9 परिचारीका कार्यरत आहेत. यामध्ये स्टाफ सिस्टर वॉर्ड 5, ऑपरेशन थिएटर स्टाफ 2, इनचार्ज 1, मेट्रन 1 असा समावेश आहे.
- सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये 29 जागा रिक्त
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये परिचारीकांना काहीवेळा डबल ड्युटी करावी लागत आहे. परिचारीकांची मंजूर पदे 73 असताना 28 परिचारीकांची भरती आहे. यामध्ये 16 कायम तर 12 ठोक मानधनावर काम करतात. 55 पदे रिक्त आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही पदोन्नती तर सोडाच, भरतीही केली जात नाही. परिचारीकांना रजा मिळणेही अवघड होत आहे.
- आयसोलेशनला केवळ दोनच नर्सेस
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये केवळ दोनच नर्सेस कार्यरत आहेत. येथे 6 नर्सेसची आवश्यकता आहे. काहीवेळा नर्सेसच्या कमतरतेमुळे डॉक्टरांनाच नर्सेसची कामे करावी लागत आहेत.
- भरतीसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव
नॅशनल हेल्थ मिशनकडे भरतीची मागणी केली आहे. रिक्त पदाच्या 50 टक्के भरती करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. सद्यस्थितीत नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून 6 नर्सेसची भरती केली आहे.
डॉ. प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका