अस्वस्थतेचे ओझे....
नमस्कार मॅडम! मी अनय आणि ही माझी पत्नी अन्वी. नमस्कार. बसा ना.
मॅडम आमच्या लग्नाला अजून वर्ष व्हायचंय परंतु नेमकं काय चुकतंय ते समजत नाही. सारीच अस्वस्थता..अन्वीने अनयला बोलताना मध्येच थांबविले. मॅडम मी बाहेर थांबते. यांचं बोलून झालं की मला बोलवाल का प्लीज? असं म्हणून चेहरा कसानुसा करत ती बाहेर गेली.
पाहिलेत मॅडम हे असं आहे. तुमचे लेख वाचून अन्वीच म्हणाली मला मॅडमला भेटायचं आहे. माझ्याही मनात होतंच पण मी सांगितले तर ही येईल का? प्रश्न होताच.
बरं...मला थोडं सविस्तर सांगाल का?
हो मॅडम. आमचं लग्न तसं उशिरा झालं.माझं वय पस्तीस तर अन्वीच वय एकतीस वर्षे. आमच्या घरी मी आणि माझे आई-वडील असे तिघेच. माझे शिक्षण एमएससी अॅग्रीकल्चर आहे. घरची शेती आणि बागायती आहे. मी ते सारं डेव्हलप केलं. आर्थिक स्थिती उत्तम आहे. कशाचीही कमतरता नाही. फक्त गावी राहतो या कारणाखातर विवाहाला विलंब झाला. अन्वीही उच्चशिक्षित आहे. तिने विवाहाला होकार दिल्यावर आमच्या घरात अत्यानंद झाला. अगदी थाटामाटात विवाह झाला. माझे आई वडील तिचे मुलीसारखे लाड करतात. घरात अगदी मोकळं वातावरण आहे परंतु तरीही अन्वी सतत दडपणाखाली असल्यासारखी असते.
कित्येक वेळा मी विचारलं तिला. काही उत्तर देतच नाही. काही वेळा म्हणते की माझं चुकतंय क्षमा करा आणि रडूच लागते. अनेकदा मूड बदलत असतात. घरी आल्यावर हसतमुखाने स्वागत केलेला एक क्षणही आठवतच नाही. सारी सुखं पायाशी लोळण घेत आहेत पण तरीही असं का? हे कोडं सुटत नाही. प्लीज काहीतरी करा मॅडम.. अगदी काकुळतीच्या स्वरात अनय बोलत होता. मी त्याला अन्वीला आत पाठवायला सांगितलं. अन्वी आत आली आणि एकदम रडायलाच लागली.मॅडम हे घटस्फोटाबद्दल काही बोलले नाहीत ना? नाही. पण तुला का असं वाटलं? कारण चूक माझीच आहे हो! देवमाणसं आहेत ती! पण मलाच असलेलं सुख उपभोगता येत नाही मॅडम! मला नीट संसार करायचा आहे. पण काय करू? अनेकदा अस्वस्थ वाटतं. असं म्हणत ती पुन्हा रडू लागली. पाच मिनिटांनी शांत झाल्यावर म्हटलं, ‘अन्वी या सगळ्यातून तुला बाहेर पडायचे हे तर नक्की ना? हो मॅडम!’ मग प्रयत्न केले तर ते नक्की शक्य आहे.
हो. तुम्ही सांगाल ते करेन मी. मी मनापासून प्रयत्न करेन!
अन्वीच्या अस्वस्थतेचे मूळ नेमकं कुठे आहे हे शोधण्यासाठी अगदी बालपणापासूनचा काळ जाणून घेणे गरजेचे होतं. तिच्या जवळच्या संवादातून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. अन्वी, तिच्या दोन बहिणी, आई-वडील, आजी असं कुटुंब! घरात तसं कडक वातावरण. तीनही मुली म्हणून नातेवाईकांचे टोमणे सततच्या चर्चा. तीनही बहिणींमध्ये अन्वी खरंतर खूप हुशार! परंतु दोघी बहिणी उंच, गोऱ्या पान तर अन्वी बुटकी आणि सावळी. त्यावरही साऱ्यांची तुलनात्मक चर्चा व्हायची. विवाह ठरायला विलंब झाला. तुझ्यासाठी बाबाला किती जोडे झिजवावे लागतात? लग्न व्हायचे तरी कधी? अशी आजीची शेरेबाजी, या साऱ्यामुळे मी दिसायला खूप वाईट आहे. माझ्यामुळे लोकांना त्रास होतो हा न्यूनगंड घेऊनच वाटचाल झालेली अन्वी स्वत:कडे आणि परिस्थितीकडे नकारात्मकतेने पाहत होती. भूतकाळात रुतून बसणे, अतिसंवेदनशीलता यामुळे समोर असलेल्या सुखाचा आनंद घेता येत नाही अशी तिची अवस्था झाली होती.
पहिल्या भेटीमध्ये आज प्रथमच मी कुणाजवळ तरी इतकं मोकळेपणाने बोलले आणि खूप हलकं वाटतंय ही अन्वीची कबुली हा एक महत्त्वाचा टप्पा होता. तीन-चार भेटीदरम्यान तिला काही गोष्टी करायला सांगत विचार-भावना-वर्तन यातील अनेक कच्चे दुवे तिचे तिला उमगले. आत्तापर्यंत आपण जो विचार केला त्यामुळे स्वत:लाच खूप त्रास करून घेतला आहे हे तिच्या लक्षात आलं. ही जाणीव झाल्यावर सजगतेच्या काही तंत्राचा उपयोग करत आवश्यक ते बदल करण्यात यशही मिळालं. भूतकाळात सतत न रमता वर्तमानाचा स्वीकार, नव्या जोमाने आयुष्य जगण्याची उमेद, वैवाहिक जीवनात पत्नी, सून म्हणून असलेल्या भूमिका, जबाबदाऱ्यांची जाणीव, अधिक प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागले.
तिच्या सासरच्या माणसांची साथ, अन्वीचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे यशही मिळाले.
अन्वीसारखी अस्वस्थतेचं ओझं झालेली अनेक माणसं पाहायला मिळतात. आपण माणसे आहोत म्हटल्यावर भूतकाळातील काही गोष्टी, भविष्याची काळजी या गोष्टी असणारच आहेत. परंतु आपल्या आजच्या समस्येकरता भूतकाळातील घटनाच कारणीभूत आहेत अशी धारणा झाली की त्या घटना, तो अनुभव आपला वर्तमानच नव्हे तर भविष्यकाळही प्रभावित करत राहतो.
खरंतर घडून गेलेल्या गोष्टींचे परिणाम आजही टिकून असण्याचे कारण म्हणजे त्या घटनेसंदर्भात मनात घोळवत ठेवलेले स्वागत असते. काही वेळा अति संवेदनशीलता आणि अगदी कमी नैराश्य सहिष्णुतेमुळे(फ्रस्ट्रेशन टॉलरन्स) लहानसहान गोष्टी मनाला लावून घेतल्या जातात आणि क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करत अस्वस्थतेचं ओझं अनेकदा आपणच वाढवत जातो. यामुळे अनेक चांगल्या गोष्टी त्याखाली दबल्या जातात, अन्वीचे हे ओझे इतकं वाढलं होतं की त्यामुळे शिकवण्याची कला, लेखन या गोष्टी त्याखाली दडल्या गेल्या होत्या.
उत्खननात एखादी गोष्ट हाती लागावी तशी स्वची यथार्थ जाणीव झाली तेव्हा आपण हे करू शकतो याचं तिला भान आलं. व्यक्तीची तत्वप्रणाली, तिला आलेल्या बऱ्या वाईट अनुभवाच्या आधारे बनत असते. पालक, आसपासचे लोक यांच्याकडून होणारी टीका टिप्पणी, कौतुक, प्रोत्साहन, मतप्रदर्शन हे आयुष्याची तत्वप्रणाली घडवण्यात महत्त्वाचा हातभार लावतात अशाच पद्धतीने प्रत्येकाची जीवन लिपी अर्थात लाईफ क्रिप्ट तयार होत असते. अर्थात वाचन, चिंतन, अनुभव यामुळे त्यात बदलही होतात परंतु आपल्या जीवनपटाचं सादरीकरण जर उत्तम व्हावं असं वाटत असेल तर विचार आणि भावनांच्या बाबतीत सजग राहणं गरजेचं आहे. अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे जाताना स्वत:चा शोध लागून विवेकपूर्ण विचारांची कास धरत आपण कशी प्रगती साधु शकतो हा विचारही महत्त्वाचा आहे. जर विचार वस्तुस्थितीवर आधारित आपले उद्दिष्ट गाठायला प्रेरित करणारे असतील तर त्यातून मिळणाऱ्या उमेदीने यशाचा टप्पा गाठता येईल आणि अस्वस्थतेचे ओझे उतरुन स्वस्थतेच्या दिशेने प्रवास होईल हे मात्र खरे!
- अॅड. सुमेधा संजीव देसाई