अंतिम सत्रातही बाजारात तेजीचा प्रवास कायम
सेन्सेक्स 484 तर निफ्टी 124 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये fिनफ्टी आणि सेन्सेक्सने 1 वर्षातील उच्चांक गाठला, बँकिंग शेअर्स आघाडीवर राहिले. तर गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फायदा झाल्याची माहिती आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या प्रमुख शेअर्सच्या तेजीमुळे बाजाराला मोठा पाठिंबा मिळाला.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आणि डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीच्या अंदाजामुळे बाजारातील भावना मजबूत राहिल्या. या वाढीसह, प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 आणि सेन्सेक्स साप्ताहिक वाढीसह बंद झाले.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 484.53 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 83,952.19 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 124.55 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 25,709.85 वर बंद झाला आहे.
ऑटो निर्देशांक 2 टक्क्यांनी आणि रिअल इस्टेट 4.1 टक्क्यांनी वाढला. वित्तीय आणि बँकिंग क्षेत्र अनुक्रमे 2.6 टक्के आणि 2 टक्क्यांनी वाढले. दोन्ही क्षेत्रांनी नवीन विक्रमी पातळी गाठली.
या आठवड्यात, मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅप जवळजवळ स्थिर राहिले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज निफ्टी 50 मधील तीन समभागांनी दिवसभर बाजाराला पाठिंबा दिला. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक अनुक्रमे 0.8 टक्के आणि 1.4 टक्के वाढले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स निकालांपूर्वी 1.3 टक्क्यांनी वधारले.
दुसरीकडे, आयटी क्षेत्र निर्देशांकात 1.6 टक्क्यांची घसरण नोंदली गेली. विप्रो आणि इन्फोसिस अनुक्रमे 5.1 टक्के, 2.1 टक्क्यांनी घसरले.