शेअरबाजाराची तेजीची घोडदौड सोमवारीही कायम
महाराष्ट्रातील निकालाचा परिणाम: निफ्टी 314 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्रातील विधानसभेचे भाजपच्या बाजुने लागलेले निकाल, सरकारी बँकांच्या समभागांमध्ये तेजी या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजारात सोमवारी दमदार तेजी पाहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या आरोपाखालील दबावात असणाऱ्या अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग सोमवारी तेजीत होते. सेन्सेक्स 992 अंकांसह तर निफ्टी 314 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 992 अंकांनी दमदारपणे वाढत 80,109 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 314 अंकांनी झेपावत 24,221 अंकांवर बंद झालेला होता. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकही 976 अंकांच्या तेजीसह 53,589 अंकांवर बंद झालेला दिसला.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 मध्ये तेजी पहायला मिळाली तर 6 समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजार निफ्टीतील 50 पैकी 43 समभाग हे तेजीसोबत तर 7 समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले. एनएनईवर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक हे तेजीसोबत कार्यरत होते. यातही निफ्टी पीएसयु बँकेचा निर्देशांक सर्वाधिक 4.16 टक्के इतका वाढला होता.
बाजारात एचडीएफसी बँक, लार्सन टुब्रो, आयसीआयसीआय बँक आणि दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज यांच्या समभागांनी चांगली तेजी राखत बाजाराला मजबूत आधार दिला. तर उलट बाजुला पाहता इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा आणि एशियन पेंटस् यांचे समभाग मात्र घसरणीत होते. एनएसईवर उपलब्ध माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी 22 नोव्हेंबरला 1278 कोटी रुपयांचे समभाग विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1722 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. एनव्हायरो इन्फ्रा इंजिनियर्सच्या आयपीओकरीता बोली लावण्याचा दुसरा दिवस होता, पहिल्या दिवशी आयपीओ 2.09 पट सबस्क्राइब झाला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे.
जागतिक बाजारात तेजी
आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 1.30 टक्के आणि कोरीयाचा कोस्पी 1.32 टक्के इतका तेजीसह कार्यरत होता. चीनचा शांघाई कम्पोझीट 0.11 टक्के घसरणीसोबत बंद झाला. 22 नोव्हेंबरला अमेरिकेतील डोव्ह जोन्स 0.97 टक्के वाढत आणि सोबत नॅसडॅकही 0.16 टक्के वाढत बंद झाला होता.