महिला-बालकल्याण खात्याची इमारत जीर्णावस्थेत
इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धोका : शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष
बेळगाव : शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. अशा अवस्थेतच कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. 100 वर्षे पूर्ण केलेल्या आणि दुर्लक्षित झालेल्या या इमारतीकडे प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 100 वर्षे पूर्ण केलेल्या या इमारतीत महिला व बालकल्याण खात्याचा कारभार चालतो. मात्र इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने दुर्दशा झाली आहे. खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आले आहेत. भिंतीनाही तडे गेले आहेत. शिवाय वरच्या छताची अवस्थाही गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत या इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे. पूर्वी या इमारतीत मूकबधीर मुलांची शाळा भरायची. या शाळेचे स्थलांतर आझमनगर येथे करण्यात आल्यानंतर 1980 पासून महिला व बालकल्याण खाते याठिकाणी कार्यरत आहे.
या कार्यालयात महिला व बालकल्याण खात्याबरोबरच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभाग, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी कार्यालय, बाल न्यायाधिकरण, शासकीय निरीक्षणालय, दिव्यांग व्यक्तीसाठी माहिती, सल्ला आणि हेल्पलाईन केंद्र आदी कार्यालये आहेत. त्यामुळे इमारतीत सतत नागरिकांची वर्दळ असते. मात्र सद्यस्थितीत इमारतीची दुर्दशा झाल्याने धोका निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांचा कारभार या इमारतीत चालतो. मात्र इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. याबरोबरच इमारतीत शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय होऊ लागली आहे. एकीकडे शासकीय कार्यालये स्मार्ट आणि हायटेक होऊ लागली आहेत. तर दुसरीकडे महिला व बालकल्याण खात्याच्या इमारतीला उतरती कळा लागली आहे. दुर्दैवाने अशा जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीत कर्मचाऱ्यांना कामे करावी लागत आहेत.
वित्त विभागाकडून 4 कोटी रुपये मंजूर
महिला व बालकल्याण खात्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी वित्त विभागाकडून 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र अद्याप त्याची कोणतीच कार्यवाही झालेली नाही. लवकरच नवीन इमारतीला प्रारंभ होईल. सध्याच्या इमारतीत दुरुस्ती करण्यात आली आहे.
- नागराज आर. (महिला व बालकल्याण खाते, सहसंचालक)