For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिगुल वाजला... धाकधूक वाढली !

06:32 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिगुल वाजला    धाकधूक वाढली
Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताणले गेलेले शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध आता जुळवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून आगामी महापालिकांच्या निवडणूका तसेच इतर निवडणूका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढणार असल्याची अधिकृत घोषणा दोन्ही बाजूंनी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून युती टिकणार की तुटणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्क -वितर्क रंगले होते. मात्र आता या घोषणेमुळे अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीची घोषणा जरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली असली, तरी या युतीमागील राजकीय गणिते आणि अटी-शर्ती तितक्याच महत्त्वाच्या ठरत आहेत. भाजपने स्वबळाचे संकेत देत मित्रपक्षांवर दबावाचे राजकारण खेळल्याची चर्चा होती, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी सत्ता आणि संघटनात्मक अस्तित्व टिकवणे हे प्राधान्याचे होते. या पार्श्वभूमीवर युतीचा निर्णय हा गरजेपोटी घेतलेला व्यवहार असल्याचे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. शिवसेनेचे (शिंदे) मंत्री आणि आमदारांच्या विरोधात लढलेल्या उमेदवारांना नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आले. यामुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस सुऊ झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला होता, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पेंद्रीय गफहमंत्री अमित शाह यांची भेट घेत याबाबत तक्रारीचा पाढा वाचला होता, शिवसेना भाजपमधील संबंध ताणल्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या काळात मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यात काही मतभेद नसल्याचे माध्यमांसमोर सांगितले. याच अधिवेशनाच्या काळात अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिल्लीला जावे लागले, याच चव्हाण यांच्यावर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आरोप केल्यानंतर मला 2 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत युती टिकवायची असल्याचे वक्तव्य चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना भाजप युती राहणार की तुटणार असा सवाल उपस्थित झालेला असतानाच, शाह आणि चव्हाण यांच्यातील दिल्लीतील बैठकीनंतर अखेर गुऊवारी रात्री प्रथमच महायुतीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेची अधिकृत बैठक झाली आणि धूसफूस संपविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना हायसे वाटत असले तरी, ही युती उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी समसमान ताकदीची न राहता भाजप पेंद्रित होत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपच्या अटी आणि शर्थीवर ही युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीची घोषणा झाली मात्र खरी कसोटी ही जागावाटपाच्या वेळी महायुतीतील मित्रपक्षांची असणार आहे. पुढील 15 दिवसात म्हणजे 30 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे, तर 2 जानेवारी 2026 अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने, पुढील 15 दिवसात जागा वाटप तसेच उमेदवार निश्चिती करावी लागणार आहे. कालावधी कमी असल्याने ही निवडणूक नगरपालिका आणि नगरपंचायतीसारखी पहिल्यांदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच पक्षाचे सगळेच उमेदवार पक्षाच्या एबी

Advertisement

फॉर्मसह अर्ज सादर करतील, त्यानंतर जिथे शक्य आहे तिथे युती, जिथे शक्य आहे तिथे आघाडी, मैत्रीपूर्ण लढती अशा पध्दतीने कधी निवडणूका झाल्या नाहीत. मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार असेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपने मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वत:ची ताकद निर्माण केली आहे. युतीचा धर्म पाळला पाहिजे, भाजप आणि शिवसेनेने एकमेकांचे पदाधिकारी किंवा नेत्यांना आपल्या पक्षात न घेण्याचे ठरले गेले आहे. सध्या शिवसेना शिंदे गटात मात्र इनकमिंग बंद झालेले असले तरी, भाजपात अजुनही इनकमिंग सुरूच असून काँग्रेसच्या नगरसेविका श्वेता कोरगांवकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजस्वीनी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर शिंदे गटात मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर इनकमिंग कमी झाले आहे. तेजस्वीनी घोसाळकर यांचे पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची राजकीय वादातून निर्घुण हत्या झाली होती. त्यानंतर दहिसर विधानसभा मतदार संघातून 2024 च्या विधानसभा मतदार संघातून तेजस्वीनी या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार असतील, अशी शक्यता असताना मात्र तेजस्वीनी ऐवजी त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी निवडणूक लढविली. उध्दव ठाकरे यांनी मात्र त्यांच्या घरातील कोण लढणार हा निर्णय त्यांच्यावर सोपवला होता, आता तेजस्वीनी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दहिसर विधानसभा मतदार संघाच्या आमदार भाजपच्या मनिषा चौधरी आहेत, 2014 च्या निवडणुकीत याच चौधरी यांनी 2009 ला आमदार असलेल्या विनोद घोसाळकर यांचा पराभव केला होता. भविष्यात या भागातील राजकारण घोसाळकर विरूध्द घोसाळकर अशी होईल ही शक्यता नाकारता येत नाही, भाजपने मुंबईतील सर्वच भागात महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली आहे. रविवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मागाठाणे विधानसभा मतदार संघात भाजपने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले, भाजपच्या वाढत्या ताकदीसमोर शिंदे गटाची स्वतंत्र ओळख धुसर बनत चालली आहे. त्यातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मुंबईतील मराठी मतदार हा कोणाकडे वळणार हे महत्त्वाचे असणार आहे. सत्तेची गरज, विरोधकांची भीती आणि पेंद्रीय नेतफत्वाचा दबाव यामुळे शिवसेना शिंदे गटाला युती शिवाय पर्याय नाही, भाजपच्या वळचणीला जाऊन आता शिवसेनेला महापालिका निवडणूका लढवाव्या लागतील. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या मतदानाची तारीख जाहीर केली, त्यानुसार 15 जानेवारी 2026 ला मतदान तर 16 जानेवारीला निकाल असणार आहे. 2 डिसेंबरला झालेल्या आणि उर्वरीत 20 डिसेंबरला होणाऱ्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निकालानंतर महिन्याच्या कालावधीवर असलेल्या या महापालिकांच्या निवडणूकांवर या 21 डिसेंबरच्या निकालाचा प्रभाव पडू शकतो. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार याविषयी आक्षेप घेतला आहे. त्यातच हा घोळ मिटवल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले असले, तरी आता थेट परिक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या आहेत, त्यात 15 दिवसांच्या कालावधीत सगळा खेळ करायचा असल्याने उमेदवारांबरोबरच राजकीय पक्षाची देखील कसोटी लागणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.