1 फेब्रुवारीला रविवारी अर्थसंकल्प सादर होणार
सुटीचा दिवस असूनही शेअरबाजार सुरू राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवार नेहमीच सुट्टीचा असतो. पण 1 फेब्रुवारी 2026 रोजी या दिवशी संसद खुली राहणार आहे. तसेच शेअर बाजारही खुला राहील. दरवर्षीप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. योगायोगाने येत्या 1 फेब्रुवारी रोजी रविवार येत असल्याने संसद भवन आणि शेअर बाजार खुले राहतील. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी (रविवार) रोजी सादर होणार असल्याने आर्थिक सर्वेक्षण 31 जानेवारी (शनिवार) किंवा त्यापूर्वीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजेच 30 जानेवारी (शुक्रवार) रोजी सादर केले जाऊ शकतो.
नियमानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जात असल्यामुळे बजेटच्या दिवशी सकाळपासून दलाल स्ट्रीटवर गर्दी असते. सामान्यत: बीएसई आणि एनएसई दोन्ही एक्सचेंज आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद असतात. तथापि, बाजार नियामक आणि अर्थ मंत्रालयाने बजेटसारख्या महत्त्वाच्या दिवशी बाजार उघडे ठेवण्यास सहमती दर्शविली, कारण बजेटच्या दिवशी बाजार नेहमीच खुले असतात. बजेटचा दिवस हा गुंतवणूकदारांसाठी औत्सुक्याचा दिवस असतो.
यापूर्वीच्या अर्थसंकल्प सादरीकरणावेळी 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी शनिवार आला होता. तो अर्थसंकल्पाचा दिवस असल्याने शेअर मार्केट खुले ठेवण्यात आले होते. रविवार, 28 फेब्रुवारी 1999 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावेळीही रविवार असूनही त्या दिवशी अर्थसंकल्प मांडण्यात आला होता.