इंग्रजांनी केली होती 64.82 खर्व डॉलर्सची लूट
ऑक्सफॅमच्या नव्या अहवालातून खुलासा : बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अद्याप शोषण
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्रजांनी भारतावर सुमारे 200 वर्षांपर्यंत राज्य केले आणि यादरम्यान ‘सोने की चिडिया’ असलेल्या भारताला दरडोई उत्पन्नाच्या हिशेबाने गरीब देश करून सोडले. जागतिक असमानतेच्या विरोधात काम करणारा ब्रिटनचा अधिकारसमूह ऑक्सफॅमच्या एका अहवालानुसार ब्रिटनने 1765 ते 1900 कालावधीत वसाहतवादादरम्यान भारतातून 64.82 खर्व डॉलर्सची लूट केली. यातील 33.8 खर्व डॉलर्स ब्रिटनच्या सर्वात धनाढ्या लोकांकडे पोहोचले. ही रक्कम इतकी मोठी होती की ब्रिटनची राजधानी लंडन 50 ब्रिटिश पाउंडच्या नोटांनी चारवेळा झाकून टाकता आली असती.
ऑक्सफॅमचा हा अहवाल सोमवारी जारी करण्यात आला. दरवर्षी जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवसापूर्वी हा अहवाल जारी करण्यात येतो. ‘टेकर्स नॉट मेकर्स’ नावाने प्रकाशित अहवालात अनेक अध्ययनं आणि संशोधनपत्रांचा दाखला देत सद्यकाळातील बहुराष्ट्रीय कंपन्या केवळ वसाहतवादाची देणगी असल्याचा दावा करण्यात आला.
ऐतिहासिक वसाहतवादाच्या काळात जगात जी असमानता आणि लुटीचा प्रकार सुरू होता, तोच आधुनिक जीवनाला आकार देत आहे. यामुळे एक अत्याधिक असमान जग निर्माण झाले असून हे जग वंशवादाला आधारित असून विभाजनाने भरलेले आहे. एक असे जग निर्माण झाले आहे, जेथे ग्लोबल साउथ (आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील कमी विकसित किंवा विकसनशील देश)मधून पद्धतशीरपणे संपत्तींची लूट सुरू आहे आणि याचा फायदा ग्लोबल नॉर्थचे (अमेरिका, युरोपचे विकसित देश) सर्वात धनाढ्या लाभ उचलत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
ब्रिटनच्या धनाढ्यांना लुटीचा हिस्सा
अनेक अध्ययनं आणि संशोधनपत्रांना आधार करत ऑक्सफॅमने 1765 ते 1900 दरम्यान ब्रिटनच्या सर्वात धनाढ्या 10 टक्के लोकांनी केवळ भारतामधून सद्यकाळाच्या हिशेबानुसार 33.8 खर्व अमेरिकन डॉलर्सची संपत्ती लुटली होती. लंडनच्या भूमीला 50 ब्रिटिश पाउंडच्या नोटांनी जवळपास 4 वेळा झाकून टाकता येईल इतकी ही रक्कम होती. सद्यकाळातील दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्या या वसाहतवादाचे फलित असून त्याचे नेतृत्व ईस्ट इंडिया कंपनीसारख्या कंपन्यांनी केले आहे. आजच्या काळातही बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बाजारपेठेवर एकाधिकार असून ग्लोबल नॉर्थच्या धनाढ्या शेअरधारकांकडून ग्लोबल साउथचे कामगार, खासकरून महिलांचे शोषण जारी ठेवून असल्याचे ऑक्सफॅमने म्हटले आहे. जागतिक पुरवठासाखळी आणि निर्यात प्रक्रिया उद्योग संपत्तीच्या लुटीची आधुनिक व्यवस्था ठरले आहेत. पुरवठासाखळीत काम करणारे कामगार अनेकदा प्रतिकूल स्थितीत काम करतात, त्यांच्या अधिकारांकडे डोळेझाक केली जाते आणि त्यांना अत्यंत कमी सामाजिक सुरक्षा मिळत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. कौशल्ययुक्त कामासाठी ग्लोबल साउथमध्ये ग्लोबल नॉर्थच्या तुलनेत 87 ते 95 टक्क्यांपर्यंत कमी पैसे मिळतात.
जागतिक पुरवठासाखळींवर वर्चस्व
दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्या जागतिक पुरवठासाखळींवर वर्चस्व ठेवून असून त्या स्वस्त श्रम, ग्लोबल साउथच्या संपदेचे सातत्याने दोहन करत लाभ मिळवत आहेत. नफ्याच्या बहुतांश हिस्स्यांवर त्यांचा कब्जा असून आर्थिक पद्धतीने शोषण अन् नियंत्रणाला जारी ठेवून आहेत.
भारतातील गरीबीसाठी कारणीभूत
1750 मध्ये भारताचे जागतिक औद्योगिक उत्पादनात जवळपास 25 टक्के योगदान होते. 1900 पर्यंत हा आकडा वेगाने कमी होत केवळ 2 टक्के राहिला. भारताच्या औद्योगिक उत्पादनात घट होण्याचे कारण आशियाई वस्त्राsद्योग विरोधात ब्रिटनची धोरणे होती. यामुळे भारताची औद्योगिक विकास क्षमता कमकुवत झाली. 1830 ते 1920 पर्यंत 37 लाख भारतीय, चिनी, आफ्रिकन, जपानी, मलेशियन आणि ग्लोबल साउथच्या लोकांना खाणींमध्ये काम करणे आणि वेठबिगारीसाठी ब्रिटनसारख्या देशांमध्ये पाठविण्यात आले होते.