कर्नाटकाच्या जलतरणपटूंची चमक
वृत्तसंस्था / दिव
येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया सागरी क्रीडा स्पर्धेत कर्नाटकाच्या जलतरणपटूंनी दर्जेदार कामगिरी करत पदक तक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. या स्पर्धेत झालेल्या पुरूष आणि महिलांच्या 5 कि.मी. खुल्या जतरलण प्रकारात अनुक्रमे कर्नाटकाच्या ध्रुपद रामकृष्णा आणि अस्मिता चंद्रा यांनी विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेच्या पदक तक्त्यात कर्नाटकाने खुल्या जलतरण प्रकारात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण 11 पदकांची कमाई करत सर्वंकश विजेतेपद पटकाविले. या क्रीडा प्रकारात तामिळनाडूने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 8 पदकांसह दुसरे स्थान तर गेल्यावर्षी या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या मणिपूरने तिसरे स्थान घेताना तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि देन कांस्यपदकांची कमाई केली. पदक तक्त्यात मध्यप्रदेशने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदकांसह चौथे स्थान मिळविले. यजमान दादरा-नगर हावेली, दमण, दिवने सहावे स्थान घेताना दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके घेतली. हरियाणाने दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह पाचे स्थान मिळविले. या स्पर्धेत जम्मू-काश्मीर, ओदीशा, नागालँड आणि राजस्थान यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. सदर स्पर्धेमध्ये विविध राज्यांतील सुमारे 1100 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे 8 क्रीडा प्रकारांचा समावेश होता.