कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासेची चमक
वृत्तसंस्था, गेबोरोनी (बोस्वाना)
विश्व अॅथलेटिक्स कॉन्टीनेंटल टूरवरील येथे रविवारी झालेल्या बोट्स्वाना गोल्डन ग्रां प्रि अॅथलेटिक्स स्पर्धेत कॅनडाचा ऑलिम्पिक चॅम्पियन आंद्रे डी ग्रासेने पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत कॅनडाच्या डी ग्रासेने पुरूषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत 9.95 सेकंदांचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविले होते. पण रविवारी झालेल्या पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत त्याने 19.84 सेकंदांचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविले. पहिल्या स्थानासाठी कॅनडाच्या डी ग्रासे आणि अॅरॉन ब्राऊन यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण ब्राऊनने 20.07 सेकंदांचा अवधी घेत दुसरे स्थान तसेच अमेरिकेच्या कॅरी किंगने 20.24 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले.
या स्पर्धेत महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कायला व्हाईटने 22.68 सेकंदांचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविताना अमेरिकेच्या डेव्हीसला मागे टाकले. डेव्हीसने 23.22 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर त्रिनीदाद-टोबॅगोच्या ली बरट्रेंडने 23.39 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. या क्रीडा प्रकारातून गॅबी थॉमसने दमछाक झाल्याने माघार घेतली. गॅबी थॉमसने या स्पर्धेत महिलांची 100 मी. धावण्याची शर्यत जिंकताना 10.95 सेकंदांचा अवधी नोंदविला. कॅनडाच्या ऑड्रे लिडकने 11.10 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान तर कॅब्रिया स्टूरगीसने 11.07 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान पटकाविले.
पुरूषांच्या 100 मी. धावण्याची शर्यत कॅनडाच्या जेरोम ब्लेकने जिंकताना 9.93 सेकंदांचा अवधी घेतला. केनियाच्या ओमानेलाने दुसरे स्थान तर डी ग्रासेने तिसरे स्थान मिळविले. द. आफ्रिकेच्या अॅडेन स्मिथने पुरूषांच्या गोळाफेकमध्ये 20.55 मी. गोळाफेक करत पहिले स्थान पटकाविले. इटलीच्या वेअरने या क्रीडा प्रकारात दुसरे तर निक पाँझिओने तिसरे स्थान घेतले. पुरूषांच्या लांबउडीमध्ये द. आफ्रिकेच्या मॅनयोंगाने 7.96 मी.चे अंतर नोंदवित पहिले स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात नामिबीयाच्या कोझीने दुसरे तर द. आफ्रिकेच्या डिव्हन मॅन्युअलने तिसरे स्थान पटकाविले.