For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ भागातील तलावांनी गाठला तळ

10:17 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ भागातील तलावांनी गाठला तळ
Advertisement

परिसरातील अंतर्जल पातळी घटण्याची शक्यता 

Advertisement

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहर परिसरातील तलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. अनगोळ येथील ढब्बू तलावानेही तळ गाठल्यामुळे या परिसरातील अंतर्जल पातळी घटणार आहे. परिणामी विहिरी तसेच कूपनलिकांचे पाणीदेखील कमी होणार आहे. त्यामुळे अनगोळ परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनगोळच्या दक्षिण भागाला असलेल्या ढब्बू तलावामध्ये दरवर्षी मे अखेरपर्यंत पाणी राहते. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने तलावामध्ये पाणी कमी होते. त्यातच सध्या वाढलेल्या उष्म्यामुळे असलेले पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे त्या तलावातील मासे पकडण्यासाठी तरुणांची धडपड सुरू झाली आहे. तलावामध्ये असलेल्या काही डबक्यांमध्ये पाणी साचून आहे. त्यामध्ये जाळे किंवा इतर साहित्याच्या साहाय्याने मासे पकडले जात आहेत. या ढब्बू तलावामध्ये अनगोळ परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. या तलावाची खोदाई करून परिसरात सौंदर्यीकरण देखील करण्यात आले आहे. मात्र त्याची देखभाल नसल्याने झाडे-झुडुपे पुन्हा वाढू लागली आहेत. या तलावाची आणखी खोदाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

काळा तलाव जलपर्णीने वेढला

Advertisement

काळा तलावदेखील पूर्णपणे जलपर्णीने वेढला आहे. या तलावामध्ये पाणी राहत होते. मात्र अनगोळ परिसरातील गटारी व ड्रेनेजचे पाणी जात असल्याने तलाव पूर्णपणे खराब झाला आहे. या तलावाच्या खोदाईसाठी महानगरपालिकेमध्ये चर्चा झाली. त्याचबरोबर निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अद्याप तलावाची खोदाई केली गेली नाही. याचबरोबर तलावामध्ये जलपर्णी वाढल्याने समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा या दोन्ही तलावांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.