बाटली तीच शॅम्पेन मात्र नवीन
मागील वर्षभरात पुलाखालून क्रिकेटचे बरेच पाणी वाहून गेले. इंग्लंडमधील टेस्ट मॅच शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत रंगली तर भारतातील सामने दोन ते अडीच दिवसात संपले. झटपट क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षानंतर किवीजने मालिकाविजयही मिळवला. परंतु त्याच न्यूझीलंड संघाला टी-20 फॉरमॅटमध्ये घरासमोरील अंगण धोपटण्याने धोपटावं तसं धोपटलं. आणि हे सर्व घडत होतं ते टी-20 विश्वचषकाचा पडघम वाजत असताना. माझे वडील मला नेहमीच सांगतात, भाग्य हे कोणाच्याच हातात नसतं. ते कुठेतरी दडलेलं असतं. खूप खूप प्रयत्न करून सुद्धा ते सापडत नाही आणि अचानक दत्त म्हणूनही उभं ठाकतं. 2023 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील पराभव आणि 2024 च्या टी-20 विश्वचषकातील अंतिम विजय हे त्याचे अगदी उत्तम उदाहरण. एकटेपणा किती भयानक असतो हे आपण कोविड काळात अनुभवलं. नेमकं हेच एकटेपण मी 2023 च्या त्या अंतिम पराभवापासून ते 2024 च्या अंतिम विजयापर्यंत अनुभवलं. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या तरीही अंगावर सरकन काटा येतो.
असो. मागील विश्वचषकाचे आपण अनषिक्त सम्राट. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव ही सर्व मंडळी 2024 च्या क्रिकेट विश्वचषकातील ऑस्करच्या शर्यतीत असलेली मंडळी. परंतु त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये संगीत मानापमान नावाचं नाटक आलं. परंतु त्याच कालावधीत ‘गौतम ही गंभीर है’ नावाचा चित्रपट आला. आणि त्यानंतर काय घडलं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा या मंडळींनी आपल्या डोक्यावरचा मुकुट खाली ठेवला. हे सर्व बघत असताना एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दु:खाचे अश्रू होते. हे सर्व बघत असताना नवोदितांना संधी देण्याच्या गडबडीत या रथी महारथीनी घाई तर केली नाही ना असं मनोमन वाटू लागतं.
2007 मधील पहिला टी-20 विश्वचषक आपण ध्यानीमनी नसताना एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली दिमाखाने उंचावला. त्यानंतर तब्बल 17 वर्षानंतर अमेरिका व विंडीज आयोजित 2024 चे आपण मानकरी ठरलो. क्रिकेट हा भारतासाठी हृदयस्पर्शी खेळ ! 2024 मधील त्या विजयाने हे हृदय खऱ्या अर्थाने तुडुंब भरलं. तेरा वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी आपण उंचावली. आणि बघता बघता क्रिकेट खेळातील छोटेखानी जगावर आपलं सामर्थ्यही सिद्ध केलं. रंग माझा वेगळा हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलं. टी-20 क्रिकेट हे ‘तो मी नव्हेच’ या आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकरांनी अदा केलेल्या भूमिकेसारखी आहे. काही खेळाडू क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये औषधालाही बसत नाहीत. परंतु तीच सर्व मंडळी या फॉरमॅटमध्ये अगदी चपखल बसतात. कधीकधी नियतीने या मंडळींना या फॉरमॅटसाठी जन्माला घातले की काय असं वाटू लागतं.
या स्पर्धेच्या निमित्ताने आयसीसीने एकंदरीत 20 संघ पात्र ठरवलेत. त्यात काही हौशे गवशे, नवशेही आहेत. फुटबॉल ज्यांचा श्वास आहे असा इटली या स्पर्धेच्या निमित्ताने या वर्ल्डकपमध्ये साईड हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये लिंबू टिंबू (नवखे) संघ हवेत कशाला? हा तुम्हा आम्हाला पडलेला प्रश्न. परंतु या संघाच्या माध्यमातून बक्कळ पैसा हेच त्याचे खरं उत्तर. अशा संघांच्या प्रवेशातून कोटीच्या कोटी उ•ाणे होतात हे आता काही लपून राहिलेले नाही. अशा या नवख्या संघांमार्फत या स्पर्धेची थोड्याफार प्रमाणात डागडुजी होते हेही तेवढंच खरं.
या स्पर्धेच्या निमित्ताने खरी चुरस कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख संघांमध्ये असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऐनवेळी धक्का तंत्र देणारा विंडीज संघ हे या स्पर्धेचे प्रमुख मानकरी. त्यातच आयर्लंड, अफगाणिस्तान, अमेरिका हे देश आश्चर्यकारक विजय नोंदवण्यात प्रसिद्ध आहेत. अफगाणिस्तान संघ मागील काही वर्षात ‘जाणता’ झालेला संघ वाटू लागलाय. परंतु नवखे संघ जाणत्या संघांचा कडेलोट करतील असे दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून दिसणं सध्यातरी फारच विरळ आहे.
2026 हे वर्ष फुटबॉल आणि क्रिकेटसाठी अगदी महत्त्वाचीच. याच वर्षी जागतिक स्तरावर फुटबॉलचा महाकुंभमेळा आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु भारतात फेब्रुवारीच्या या व्हॅलेंटाईनच्या महिन्यात क्रिकेटवरील प्रेम उतू जाणार, एवढं मात्र निश्चित. थोडक्यात काय, दर दोन वर्षांनी टी-20 च्या माध्यमातून येणारी जत्रा यंदा भारतात आणि श्रीलंकेत आहे. एकंदरीत काय या जत्रेतून क्रिकेटरुपी मिळणारी नशा तीच आहे किंबहुना मी तर असे म्हणेन की, बाटली तीच आहे शॅम्पेन मात्र नवीन !