For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ राज्यपालांच्या अभिभाषणाने सीमाप्रश्न सुटणार नाही!

06:58 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
केवळ राज्यपालांच्या अभिभाषणाने सीमाप्रश्न सुटणार नाही
Advertisement

माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सुनावणीवरून माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. केवळ राज्यपालांच्या अभिभाषणात सीमाप्रश्नाचा उल्लेख करून चालणार नाही तर तेथील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत व तेथील जनतेला महाराष्ट्रात सामील होण्यासाठी मदत करावी, अशा शब्दात जयंत पाटील यांनी सल्ला दिला.

Advertisement

मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सीमाप्रश्नाचा उल्लेख करत सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सांगितले होते. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी सीमाप्रश्नाचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयीन कामकाज अगदी जवळून माहिती आहे. एखादी बाब आपल्या बाजूने करून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आपले अनेक गूढ संबंध पणाला लावू शकतात, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या याच चातुर्याचा वापर करून सीमाप्रश्नाची सुनावणी पटलावर आणून सीमाबांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी...

माजी मंत्री जयंत पाटील हे विधानभवनातील एक चतुर आणि अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी सीमाप्रश्नावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर कायद्याचा जो वापर केला तसाच वापर मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नाच्याबाबतीत करावा. मुख्यमंत्री स्वत: वकील असल्यामुळे त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करून सीमावासियांना न्याय द्यावा. त्यांनी जर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीची गोष्ट मनावर घेतली तर निश्चितच मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Advertisement
Tags :

.