For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाप्रश्नासाठी आता जोमाने लढा लढणार

10:39 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमाप्रश्नासाठी आता जोमाने लढा लढणार
Advertisement

बेळगाव : सीमाभागातील युवकांनी सीमाप्रश्न व त्यासंदर्भातील होणाऱ्या घडामोडीबाबत मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते. बैठकीत म. ए. समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी परखडपणे मते मांडून सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याबाबत आता जोमाने लढाई लढण्याचे ठरविले. मध्यवर्तीचे सदस्य मनोहर हुंदरे यांनी स्वागत केले. खानापूर युवा समितीचे धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. येथील मराठी जनता म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी व मराठी अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. सर्वोच्च न्यायालयातही खटल्यासाठी येथील सर्व कागदपत्रे पुरविली आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये मात्र म. ए. समितीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे मराठी भाषिकांना धक्का बसला आहे. तेव्हा आता आर या पारची लढाई लढणे गरजेचे असल्याचे समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी सांगितले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे घोषित केले.

Advertisement

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा ठराव केला. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारवर अधिक दबाव आणणे गरजेचे आहे. तेव्हा यासाठी महाराष्ट्र सरकारने आता पाठपुरावा करावा, असे सुशील पाटील यांनी सांगितले. सागर कणबरकर म्हणाले, येथील सर्वच मराठी भाषिकांनी सीमालढ्याचे बाळकडू बालपणीच घेतले आहे. या लढ्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. कन्नड सक्तीविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे, असे विनायक हुलजी या कार्यकर्त्याने सांगितले. मल्हारी पावशे म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षांना बळी न पडता सीमाप्रश्नासाठी समितीच्या झेंड्याखाली येणे महत्त्वाचे आहे. यावेळी सुनील बोकडे, रमेश माळवी, नारायण मुचंडीकर, भावेश बिर्जे, शांताराम होसूरकर यांनीही विचार व्यक्त केले. नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून एकीसाठी आवाहन केले. प्रवीण रेडेकर यांनी आभार मानले. बैठकीला चंद्रकांत पाटील, विजय जाधव, दत्ता पाटील, अभिजित मजुकर, राजू पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.