गोवा मुक्तिसंग्राम अन् तरुण भारतचे ऋणानुबंध
तरुण भारतने गोमंतकीयांचा आवाज केला बुलंद : कै. बाबुराव ठाकुरांनी पोर्तुगीजांवर ओढले सडेतोड आसूड : गोव्याचा आज 64 वा मुक्तिदिन, कार्यक्रमांचे आयोजन
पणजी : गोवा मुक्त झाल्यानंतर गोव्यातच नव्हे, तर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गोव्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये तर खुल्या मैदानांमध्ये आनंदाच्या जाहीर सभा झाल्या आणि गोमंतकीय जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा आनंदोत्स साजरा होणे साहजिक होते, कारण बेळगाव शहर, कै. बाबुराव ठाकुर, दै. तरुण भारत आणि संपूर्ण बेळगाव जिल्हा यांचे गोव्याशी ऋणानुबंध होते. कै. बाबुराव ठाकुर आणि दै. तरुण भारत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेले योगदान ऐतिहासिक ठरले आहे. गोवा मुक्तीचा लढा साडेचार शतके म्हणजे 451 वर्षे सुरु होता. या लढ्याच्या शेवटच्या पर्वात म्हणजे 18 जून 1946 ते 19 डिसेंबर 1961 या काळात गोमंतकीयांबरोबरच देशाच्या विविध भागांतील राष्ट्रवादी लोकांनी गोवा मुक्तिसंग्रामात उडी घेतली. देशभरातून गोव्यात सत्याग्रह करण्यासाठी येणाऱ्यांना महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागांजवळ केंद्रे होती. तेरेखोल, आरोंदा, दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, बेळगाव, कारवार अशा ठिकाणी केंद्रे होती. मात्र यापैकी सर्वांत मोठे केंद्र होते ते म्हणजे बेळगाव !
बाबुराव ठाकुरांचा एल्गार
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ज्येष्ठ लढवय्ये तथा दै. ‘तरुण भारत’चे संस्थापक संपादक कै. बाबुराव ठाकुर यांचे बेळगावातील निवासस्थान म्हणजे गोव्याच्या मुक्तीलढ्याचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. गोवा मुक्त करण्याच्या ध्येयाने भारलेल्या भारतीय राष्ट्रवादी तरुणांचे बाबुराव ठाकुर हे प्रेरणास्थान होते. बाबुराव ठाकुर यांनी गोवा मुक्त व्हावा, यासाठी पोर्तुगीजांविरुद्ध आपली लेखणी बुलंद केली होती. पोर्तुगीजांनी गोमंतकीय जनतेचा आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच आर्थिकदृष्ट्याही छळ चालविला होता, त्यावर त्यांनी सडेतोडपणे आसूड ओढले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही राजकारण्यांना, विचारवंतांना त्यांनी गोवा मुक्तीप्रती अधिक सजग, आग्रही करण्याची भूमिका निभावली. ‘तरुण भारत’ने पोर्तुगीजांविरुद्ध एल्गार पुकारला होता.
स्वातंत्र्यसैनिकांचे आश्रयस्थान
बाबुराव ठाकुरांचे निवासस्थान म्हणजे देशभरातून गोव्यात प्रवेश करुन आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रवादी तरुणांचे तसेच ज्येष्ठांचे बेळगावातील आश्रयस्थान बनले होते. त्यांच्या घरी त्यांच्या जेवण्याखाण्याची, आंघोळीची, निवासाची व्यवस्था देशप्रेमाने भारलेले ठाकुर कुटुंबीय ममत्वाने करत होते. त्यांच्या पत्नी कै. माई ठाकुर, त्यांचे चिरंजीव किरण ठाकुर व अन्य सदस्य त्या सर्वाची उठबस करायचे. या घरातूनच सत्याग्रहींना आवश्यक ती मदत दिली जायची. गोव्यासाठी अनेकांच्या संपर्कात बाबुराव ठाकुर यांनी गोवा मुक्त व्हावा, यासाठी ‘तरुण भारत’मधून प्रयत्न केले होते. त्याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु तसेच अन्य राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कात ते होते. तत्कालीन खासदार ना. ग. गोरे, जयवंतराव टिळक, बॅरिस्टर नाथ पै, विनायक कुलकर्णी अशा अनेक मंडळीसोबत बाबुराव ठाकुरांनी कार्य केले होते. सावंतवाडीचे जयानंद मठकरही त्यांच्या संपर्कात होते. सावंतवाडी केंद्राचे मठकर प्रमुख लढवय्ये होते.
बेळगाव जिल्ह्यात विशेष आस्था
दै. तरुण भारतमधून बाबुराव ठाकुर यांनी गोव्याच्या मुक्ती संग्रामावर सातत्याने प्रकाशझोत टाकल्याने बेळगाव जिल्ह्यासह कारवार, निपाणी, कोल्हापूरपर्यंतच्या भागात वातावरण निमिर्ती झाली होती. तेथील लोकांना गोव्याच्या प्रदीर्घ लढ्याबाबत बातम्या, लेखांतून माहिती मिळत होती. त्याचा प्रभाव म्हणून बेळगाव जिल्ह्यात गोव्याच्या मुक्तीलढ्याबाबत विशेष आस्था निर्माण झाली होती.
बेळगावात पसरला आनंदोत्सव
गोवा मुक्त झाल्यांनतर गोव्यासह देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्या आनंदोत्सवातही बेळगाव अग्रेसर होते. भारतातील सर्व राज्यांमधील भारतीयांना गोव्यात जाता यावे आणि गोमंतकीयांना भारतभरात सहजतेने प्रवेश करता यावा, यासाठीची सुलभ परवाना पद्धत भारत सरकारने करावी, असा आग्रह तरुण भारतने लावून धरला होता. त्याची दखल नंतर भारतीय सैन्याने घेतली आणि सुलभ प्रवेश परवाने मिळू लागले, याबद्दल बेळगावासियांनी आनंदोत्सव साजरा केला. गोवा मुक्त केल्यानंतर भारतीय हवाई सेनेने जी विजयोत्सव मोहीम केली, त्यामध्ये विमानांतून तसेच हेलिकॉप्टर्समधून मराठी व कोंकणी भाषेतील पत्रकांचा वर्षाव करण्यात आला होता.