कोल्हापूर आणि पंचगंगेचं नातं
कोल्हापूर :
कोल्हापूर आणि पंचगंगेच नातं हे माय लेकराच. म्हणूनतर पंचगंगेला करवीरची जीवनदायिनी म्हटलंय. कोल्हापूर शहरात प्रवेश करतांना पूर्वाभिमुख असलेला नदीचा प्रवाह एक सुंदर वळाण घेऊन उत्तराभिमुख होतो. चंद्रकोरीच्या आकाराच्या या वळणामुळे निर्माण झालेल्या भौगोलिक अनुकूलतेमुळे या वळणावर करवीर नगरी जन्माला आली. पौराणिक संदर्भाप्रमाणे एका उत्तम लक्षणांनी युक्त अशा वसाहतीसाठी सांगितलेले निकष या नगरीला तंतोतंत जुळतात. याबबत करवीर माहात्म्य या स्थलपुराणात एक श्लोक आला आहे.
श्मशानं उखरं क्षेत्रं पुरं पीठं तथैव च । पंचैतानि न लभ्यते करवीरपुरं विना ( क. मा. 2 / 24 ) उत्तम असं मुक्तीदायक स्मशान, सांडपाण्याच्या निर्गतीची उत्तम व्यवस्था, कसदार उत्तम पिकं निर्माण करणारी भूमी (क्षेत्र), निवासासाठी चांगल्या दर्जाची घरे व वास्तू निर्माण करण्यासाठी योग्य जमीन आणि एखाद्या देवतेचे अधिष्ठान (पीठ). या सर्व लक्षणांनी युक्त भूभागावरच उत्तम नगरीची निर्मिती होऊ शकते, असा या स्लोकाचा भावार्थ आहे. उत्तरेला काशी आणि दक्षिणेला करवीर ही दोन नगरे अशा लक्षणांनी युक्त आहेत. करवीरमाहात्म्यात सांगितलेले वे वर्णन आज सुद्धा कोल्हापूरला जुळणारे आहे. आणि या पाचही लक्षणांसाठी जीवनदायिनी पंचगंगेचा प्रवाह कारणीभूत आहे.
खरे तर पंचगंगेच्या या प्रवाहमार्गातूनच (शिवाजी पूल होण्यापूर्वी) कोल्हापुरात प्रवेश करण्याचा राजमार्ग होता. या दृष्टीने कोल्हापूरचे प्रवेशव्दार हा मान या मार्गालाच जातो. (गेट वे ऑफ कोल्हापूर) पुणे मुंबईच्या बाजुला जाणारा महामार्ग तयार झाला, तिथली रहदारी प्रचंड वाढली. नव्या पिढीसाठी कोल्हापुरात प्रवेश करणारा हा मुख्य रस्ता बनला. याही मार्गाने पंचगंगा ओलांडूनच कोल्हापुरात यावे लागते. ब्रम्हपुरीच्या उत्खननातून कोल्हापूरचा रोमसारख्या दूरदेशांशी असलेले व्यापारी संबंध हे पंचगंगेच्या पात्रातील प्राचीन प्रवासमार्गावरच अवलंबून होते. उपलब्ध जुन्या छायाचित्रांचा अभ्यास करतांना शिवाजी पुलासारखी रचना करण्यासाठीचा योग्य नदी उतार याच ठिकाणी होता हे स्पष्ट होते.
प्रयाग चिखली पासून थेट पंचगंगा कृष्णेला मिळेपर्यंतच्या प्रवाहमार्गावर असंख्य ऋषीमुनींचे आश्रम, तसेच अनेक देवतांची मंदीरे होती याचे उल्लेख करवीर माहात्म्यात सापडतात. च्यवन, ऋष्यशृंग, अगस्ती यांची स्थाने आजसुद्धा अस्तित्वात आहेत. या परिसरात शिवाची उपासना मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नदीच्या प्रवाहमार्गावर ठिकठिकाणी शिवालये आहेत. त्याशिवाय दत्ताच्या उपासनेची स्थानेपण पहायला मिळतात. तसेच लोकपरंपरेतील जलदेवता, लोकदेवता, मारुती, नागदेवता यासारख्या देवतांची मंदिरे किंवा मूर्तीशिल्पे पण मोठ्या प्रमाणात या मार्गावर आढळतात. महात्म्य ग्रंथात तर प्रत्येक कोस अंतरावर ऋषींचे स्थाने असल्याचे वर्णन आहे. त्याचबरोबर नदीतीरावरील वसाहतीतील लोकांच्या पूजेतील जुन्या मूर्ती, खंडित झालेल्या मूर्ती. वीरगळ. सतीशीळा यांच मोठ भांडारच नदीच्या घाटावर आढळून येते.
इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटना या नदीच्या साक्षीने घडल्या. निसर्गाच्या प्रचंड प्रकोपामुळे अनेकदा संपूर्ण वसाहती गाडल्या गेल्या. पुन्हा नव्यान निर्माण झाल्या. गाडल्या गेलेल्या वसाहतीच्या पुरावशेषांनी इतिहासादे हे दुवे आपल्या हृदयात जतन करून ठेवले. भावी काळातील संशोधनासाठी निसर्गाने जतन केलेला हा अनमोल ठेवा उत्खननात अनेक रहस्ये उघड करणारा ठरला. या लेखमालेच्या पुढील भागात पंचगंगेच्या काठावरील उत्खननातून उलगडलेल्या या जीवनदायिनीच्या प्राचीन इतिहासावर नजर टाकुया.