For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रामृताचा रस सर्व शरीरभर पसरल्यामुळे योग्याचे शरीर तेजस्वी दिसू लागते

06:56 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्रामृताचा रस सर्व शरीरभर पसरल्यामुळे योग्याचे शरीर तेजस्वी दिसू लागते
Advertisement

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।। 14 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. विवरणात माउली म्हणतात, सद्गुरूंचे स्मरण चित्त व इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन करून योगाभ्यासास सुरवात करावी. आसनसिद्धी झाल्यावर मूलबंधात कोंडला गेलेला अपानवायू ऊर्ध्वगतीने माघारा फिरून मणिपूर चक्राला धक्के देत रोगांना नष्ट करतो. वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते. त्यामुळे ती चवताळते आणि तिचे प्रताप दाखवू लागते. शेवटी प्राण आणि अपान रोखून शांत झालेली कुंडलिनी सुषुम्नेजवळ राहते. ती तोंडाने जी गरळ ओकते त्या योगाने प्राणवायु जगतो.

Advertisement

तो गरळरूपी अमृताचा अग्नी शरीरात कुठेही दाह निर्माण न करता आत व बाहेर थंडावा निर्माण करू लागतो, त्यामुळे सर्व शरीरात नवचैतन्याचा उदय होतो. अनुमानाने ठरवलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्रसूर्यरूपी वायु, नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. बुद्धी चैतन्यात नाहीशी होते. नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची शक्ति, कुंडलिनीबरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस हळू हळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. त्यातून तो रस सर्वांगामध्ये संचार करतो.

ह्यामुळे प्राणवायु जेथल्या तेथे मुरतो. ह्या रसाचा चमत्कार असा की, साचा ओतलेल्या रसानेच ज्याप्रमाणे भरून रहाते. त्याप्रमाणे हा रस सर्व शरीरव्यापून रहात असल्याने शरीराच्या आकाराने मूर्तिमंत तेजच प्रकट होते. शरीर तेजस्वी दिसू लागते. योग्याच्या तेजस्वी शरीराला निरनिराळ्या उपमा देऊन माउली योग्याचे शरीर किती तेज:पुंज दिसते ते आपल्याला सांगत आहेत. ते

Advertisement

म्हणतात, सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही. त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून गेल्यावर जणु काय मूर्तिमंत स्फटिकच वाटावा अथवा रत्नरूप बीजास निघालेला अंकुर अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते.

अथवा संध्याकालच्या आकाशरंगाचे रंग काढून बनवलेले किंवा प्रत्यगात्म्याचे शुद्ध लिंगच वाटावे असे योग्याचे शरीर दिसते. केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, असे ते शरीर मूर्तिमंत शांतीचे प्रतिक वाटते. योग्याच्या तेज:पुंज शरीराबद्दल किती सांगू आणि किती नको असे माउलींना झालेले आहे. ते म्हणतात, योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्ती किंवा संतोषरूप झाडाचे बाळसेदार रोप असते. तो योगी म्हणजे सोनचाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजुकपणाचा भरास आलेला मळाच होय. त्याचे शरीर म्हणजे शरदऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय असा भास होतो.

हा सगळा जागृत झालेल्या कुंडलीनीच्या चंद्रामृत पिण्याचा परिणाम असतो. त्या देहाकडे पाहून यम भितो. योग्याच्या शरीरात काय काय बदल होतात ते सांगताना माउली म्हणतात, त्याचे म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.