बेपत्ता विमानातील पायलटचा मृतदेह सापडला
विमान चांदिल धरणात कोसळल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/रांची
झारखंडमधील जमशेदपूर येथील सोनारी विमानतळावरून 20 ऑगस्ट रोजी उ•ाण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी बेपत्ता झालेले विमान धरणामध्येच कोसळल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. सदर विमानातील प्रशिक्षणार्थी वैमानिक शुभरोजित दत्ता यांचा मृतदेह गुऊवारी सकाळी 10 वाजता चांदिल धरणातून बाहेर काढण्यात आला. भारतीय नौदल आणि एनडीआरएफचे पथक मुख्य वैमानिक जीत शत्रु आनंदच्या शोधात कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृतदेह सापडल्याने विमान धरणात पडून अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेपत्ता झालेले विमान अल्केमिस्ट एव्हिएशन कंपनीचे असून ती जमशेदपूरमध्ये पायलट प्रशिक्षण संस्था चालवते. विमान बेपत्ता झाल्यानंतर अपघाताची शक्मयता लक्षात घेऊन विमानतळ व्यवस्थापनाने पूर्व सिंघभूम आणि सेराईकेला-खरसावन जिल्हा प्रशासनाला मदतीची विनंती केली होती. विमानाच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे मंगळवारी दुपारपासूनच जमशेदपूरच्या दलमा वन्यजीव अभयारण्य आणि आसपासच्या परिसरात शोध सुरू करण्यात आला होता.
संपूर्ण परिसरात हेलिकॉप्टरने शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र कोणताही सुगावा लागला नव्हता. याचदरम्यान, चांदिल धरणात आंघोळ करत असलेल्या तपन मांझी आणि ऊसा मांझी या दोन गावकऱ्यांनी धरणात विमान पडताना पाहिल्याचे शोधणाऱ्या पोलिसांना सांगितले. त्यांच्या माहितीच्या आधारे बुधवारी सकाळपासून एनडीआरएफची टीम शोधमोहीमेत गुंतली आहे. अपघातग्रस्त दोन आसनी विमान अमेरिकेत तयार करण्यात आले असून त्याचे नाव ‘सेश्ना 152’ आहे. हे सिंगल इंजिन असलेले विमान आहे. अल्केमिस्ट एव्हिएशन प्रा. लि.द्वारे जमशेदपूरमधील पायलट प्रशिक्षण संस्था 2008 पासून चालवली जात आहे. त्याची संचालक मृणाल पॉल आहे. मार्च 2022 मध्येही सोनारी विमानतळावर या संस्थेचे प्रशिक्षण विमान कोसळले होते. या अपघातात दोन पायलट जखमी झाले होते.