देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर
अध्याय नववा
ईश्वराची सगुण आणि निर्गुण अशी दोन रूपे असतात. सगुण रूपातील देव भक्तांच्या नजरेसमोर तरळत असल्याने त्याला तो आपलासा वाटतो. त्याउलट निर्गुण रुपाला कोणताही आकार असा नसतो. त्यामुळे निर्गुण रूपाची उपासना करणे सगुण रुपाची उपासना करण्यापेक्षा अवघड असते. आपण कोणती उपासना करावी म्हणजे बाप्पांना ती आवडेल असा प्रश्न भक्ताच्या मनात उभा राहतो. भक्ताच्या मनातील हा प्रश्न जाणून वरेण्य महाराजांनी बाप्पांना विचारले, जो अनन्यभक्त मूर्तीरूपाने तुझी उत्तम प्रकारे उपासना करतो आणि जो श्रेष्ठ अशा अविनाशी अव्यक्ताची म्हणजे निर्गुण ब्रह्माची उपासना करतो त्या दोघांपैकी तुला अधिक प्रिय कोण आहे? अनन्यभावस्त्वां सम्यङ्मूर्तिमन्तमुपासते । योऽक्षरं परमव्यत्तं तयोऽ कस्ते मतोऽधिकऽ ।। 1।। हा श्लोक आपण सध्या अभ्यासत आहोत. समोर आपल्यासारखीच ईश्वराची मूर्ती दिसत असली की, मनुष्य त्यात जास्त रमतो कारण माणसाला प्रेम करायला त्याच्यासारखाच देहधारी समोर असावा लागतो. मग त्याची चरित्रे, लीला, गुणवर्णन, त्याचं साधू रक्षणाचं कार्य यांच्या आठवणीत तो रंगून जातो. ही सगुणोपासना होय. तर ईश्वर निर्गुण निराकार आहे हे त्याचे मूळ स्वरूप लक्षात घेऊन ज्ञानमार्गी त्याची निर्गुण रूपात उपासना करतात.
साधुसंत सगुणोपासना करण्याची शिफारस करतात कारण सगुणोपासना पूर्ण झाल्याशिवाय निर्गुण उपासना करता येत नाही. सगुणोपासनेत भगवंतांवर मनापासून प्रेम करण्याला फार महत्त्व आहे. ज्याच्यावर आपले मनापासून प्रेम असते त्याच्यावर आपण निरपेक्ष प्रेम करत असतो. उदाहरणार्थ आजी आजोबांचे नातवंडावर मनापासून प्रेम असते. त्यांना त्यांच्याकडून काहीही नको असते. त्यांचे बोल ऐकून आजीआजोबा हरखून जातात. नातवंडांना ते दुधावरच्या सायीप्रमाणे जपतात. त्याप्रमाणे भक्ताचे ईश्वराच्या सगुण रूपावर मनापासून प्रेम असते. निरपेक्षतेने सगुणोपासना करत करत देव आपल्यातच आहे असा साक्षात्कार भक्ताला होऊ लागतो. आपण आणि देव एकच आहोत हे त्याच्या लक्षात येते. तसेच आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या व्यक्तींमधील ईश्वरही त्याला दिसू लागतो. त्याचा आपपर भाव मावळतो. असं सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व जाणवू लागलं की, पुढं जाऊन ईश्वराचं सर्वव्यापी स्वरूप भक्ताच्या लक्षात येऊ लागतं. आता त्याला उपासना करण्यासाठी सगुण साकार स्वरूपातल्या ईश्वराच्या मूर्तीची गरज भासत नाही. तो तुकोबारायांचा देह देवाचे मंदिर हा अभंग प्रत्यक्ष अनुभवू लागतो. तुकोबाराय म्हणतात, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ।।1।। जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर । जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि ।।2।। देव देहात देहात, का हो जाता देवळात। तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ।।3।।
अर्थात अशी अनुभूती येण्याला बराच काळ सगुणोपासना करावी लागते आणि मग निर्गुणत्वाचा साक्षात्कार होऊ लागतो. त्यामुळे निर्गुण उपासना करतो म्हणून ती होत नाही. त्यासाठी माणसाची मानसिकता तशी व्हावी लागते. ती तशी तयार झाली की, त्याला संसार असार वाटू लागतो, त्यातील मिथ्यत्व त्याच्या लक्षात येते. त्याचबरोबर त्याला सर्वव्यापी असलेल्या ईश्वराचे अस्तित्व सर्व वस्तू आणि व्यक्तीत जाणवू लागते. वरील श्लोकात वरेण्यराजा बाप्पाना विचारतोय की, तुला सगुणोपासना करणारा भक्त आवडतो की, निर्गुणोपासना करणारा तपस्वी आवडतो?
स्वत: वरेण्यराजा आत्मज्ञानी आहे. त्याने ईश्वराचे सत्य स्वरूप जाणलेले आहे, तरीही सामान्य माणसाचे शंका निरसन व्हावे ह्यासाठी त्याने बाप्पांना हा प्रश्न जाणूनबुजून विचारला आहे, हे त्याने पुढील श्लोकात केलेल्या विनंतीवरून लक्षात येते.
क्रमश: